भारतीय पारपत्र, आधारकार्ड जप्त
marathinews24.com
पुणे – कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांनी भारतीय पारपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगलादेशी महिलांसह तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. लिझा मकबूल शेख ऊर्फ खातून तस्लीमा मोफीजूर रेहमान (वय ३०), रिंकीदेवी ऊर्फ खातून तमीना मकबूल मोरल (वय ३८, दाेघी सध्या रा. सिद्धिविनयाक सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज, मूळ रा. बांगलादेशी), प्रमोदकुमार चौधरी (रा. फतेहपूर, नालंदा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याकडून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
पुणे, मुंबई, ठाणे परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पकडले होते. बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती पाेलीस कर्मचारी सागर नारगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून लिझा आणि रिंकीदेवी राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकला. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा दोघींनी भारतीय पारपत्र दाखविले.
त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली असता, त्यांच्याकडे बांगलादेशी पारपत्रही सापडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले, उपनिरीक्षक युवराज शिंदे, नीलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्नील शर्मा, पूजा खवले यांनी ही कामगिरी केली.
भारतीय पारपत्र मिळवून तीन वेळा बांगलादेशात
लिझा शेखने प्रमोद चौधरीशी विवाह केला आहे. भारतीय पारपत्र काढल्यानंतर ती तीन वेळा बांगलादेशात जाऊन आली होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. प्रमोद कुमारने बिहारमधून लिझा आणि तिची बहीण रिंकी देवी यांचा जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळविला. त्याआधारे त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड मिळविले. त्या कागदपत्रांच्या आधारे दोघींचे पारपत्र काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.