सिंहगड रस्त्यावर विचित्र अपघात
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसमधील प्रवाशांच्या तुडूंब गर्दीत पुढच्या दरवाज्यातून उतरण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयीन तरुणी पाय घसरुन रस्त्यात पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या विद्यार्थी वाहतूक करणार्या बसच्या चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. २४) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हाहॉटेलच्या विरूद्ध बाजूस स्वारगेटकडे जाणार्या लेनवर घडला आहे.
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
कंचन बळवंत खड्डा (वय २५, रा. गिरीनगर, खडकवासला, मूळ-हनुमानगढ, राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातास जबाबदा ठरल्याप्रकरणी पीएमपी चालक आणि विद्यार्थी वाहतूक करणार्या बस चालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही बस चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंचन खड्डा मूळची राजस्थानातील हनुमानगढची रहिवासी होती. तिने भारत तंत्रज्ञान संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयटी) येथे शिक्षण घेत होती. ‘एमटेक’च्या द्वितीय वर्षात ती ‘सेमीकंडक्टर चिप डिझाईन’ या विषयाचे शिक्षण घेत होते. या विषयात तिला पी.एचडी करायची होती. ‘डीआयटी’तील वसतिगृहात कंचन राहत होती. सोमवारी (दि.२४) दिघी येथील संरक्षण संशोधन संस्थेतील (डीआरडीओ) प्रयोगशाळेत तिचे प्रात्यक्षिक होते. त्यामुळे कंचन खडकवासलातून पीएमपीएल बसने प्रवास करीत होती.
सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर बसच्या पुढील दरवाज्यातून कंचन उतरण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी पाय घसरल्याने ती रस्त्यावर पडली. दुदैवाने सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे निघालेल्या विद्यार्थी वाहतूक करणार्या बसच्या चाकाखाली सापडल्याने कंचन गंभीररित्या जखमी झाली. तिला तातडीने सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथीलखासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बस चालकांना ताब्यात घेतले. सिंहगड रस्त्यावर वर्दळीच्या वेळी अपघात झाल्याने नागरिकांचा थरकाप उडाला होता. तरुणीच्या दुर्देवी मृत्यूनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
वाहतूक व्यवस्थेच्या तुटपुंज्या सेवेचा परिणाम-खासदार सुप्रिया सुळे
खानापूर-स्वारगेट पीएमपीएल बसमधील प्रचंड गर्दीमुळे पडून तरूणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. मृत तरुणीच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.दरम्यान, संबंधित अपघात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुटपुंज्या सेवेचा परिणाम आहे. पुणे महापालिका आयुक्त व पीएमपीएमएल प्रशासनाने या मार्गावर बस फेर्यांची संख्या वाढवून गर्दीचा ताण कमी करावा. यासोबतच तरुणीच्या कुटुंबाला प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.























