पाषाणमधील पोलीस संशोधन केंद्रात वाहिले पुष्पचक्र
marathinews24.com
पुणे – पोलीस स्मृती दिनानिमित्त मंगळवारी (दि. २१ ) शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले. पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.
लोणीकंद भागात वित्रित्र अपघातात दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी
लडाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैन्याने हाॅटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्याला दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंड दिले. त्यांचा हल्ला परतावून लावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात १० पोलीस कर्मचारी धारातिर्थी पडले. तेव्हापासून देशभरात २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन पाळण्यात येत असून, यादिवशी देशभरात हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते.
पुणे पोलिसांकडून पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात मंगळवारी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून फैऱ्या झाडून आदरांजली अर्पण केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल उपस्थित होते.



















