पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी अटकेत – देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लूटमार, तसेच युवतीवर अत्याचार करुन पसार झालेल्या आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड परिसरात ही घटना घडली होती.
आमिर सलीम पठाण (वय ३०, रा. अकलूज, जि. सोलापूर), विकास नामदेव सातपुते (वय २८, रा. भिगवण , जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली गावाजवळ ३० जून रोजी पहाटे ही घटना घडली होती. देवदर्शनासाठी निघालेले कुटुंब पहाटे स्वामी चिंचोली गावाजवळील उपाहारगृहाच्या परिसरात थांबले होते. तेथे त्यांनी चहा प्याला. त्यावेळी दुचाकीवरुन आलेले चोरटे पठाण आणि सातपुते यांनी कोयत्याचा धाक दाखविला. कोयत्याचा धाकाने एका महिलेेचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी एका युवतीला कोयत्याचा धाक दाखवून उपाहारगृहाच्या परिसरात असलेल्या झाडीत ओढून नेले. युवतीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
युवतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी पठाण आणि सातपुते पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवणे, दौंड,तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सराइतांची चौकशी सुरू केली. युवतीने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते. संशयिताची माहिती देण्याचे आवाहन पोलिसंनी केले होते. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने पठाण आणि सातपुते यांना अटक केली.