कोथरूड भागातील घटना
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील दोन महिलांची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुख्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव उधळला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी मार्च महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले होते. महिलेने सुरुवातीला काही रक्कम चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केली. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ३३ लाख ४९ हजार रुपये गुंतविले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील आणखी एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, तसेच अनोळखी संदेश, लिंक उघडू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.