सामाजिक स्थित्यंतरांसाठी साहित्य कृतींचे मोलाचे योगदान

सामाजिक स्थित्यंतरांसाठी साहित्य कृतींचे मोलाचे योगदान

पुणे पुस्तक जत्रेत इंग्रजीत लेखन करणाऱ्या साहित्यिकांशी संवाद

marathinews24.com

पुणे – समाजमन बदलविण्यासाठी, सामाजिक स्थित्यंतरे घडविण्यासाठी साहित्य कृतींचे मोलाचे योगदान आहे. मृत्युनंतर जगण्यासाठी साहित्य नेहमीच उपयुक्त ठरते, कारण तुमचे विचार, तुमच्या भावना या साहित्यकृतीतून कायम जिवंत राहतात. साहित्यक्षेत्रात मानसिक भावभावना, मानसिक आरोग्य याविषयी व्यक्त होणे आवश्यक आहे. साहित्य कृतीतून प्रकटीकरणावर विश्वास ठेवत आपल्या विचार व भावनांची मांडणी करणे सोपे जाते. तसेच समाजातील सत्य घटना, सामाजिक स्थिती यावरही भाष्य करता येते, असे मत सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्य निर्मिती करणाऱ्या विख्यात लेखकांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनची कामगिरी देशात अव्वल – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने 23 व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात शुक्रवारी (दि. 31) इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. अतुल बेंगेरी, सोनल अग्रवाल, ज्योती झा, अनिकेत सोमण, गरिमा गुप्ता, निवृत्त ब्रिगेडिअर प्रथमेश रैना आणि ज्यात्स्ना बिडवे सहभागी झाले होते.

लेखक म्हणून कसे घडलो या विषयावर त्यांच्याशी रोहित जेराजानी यांनी संवाद साधला. आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ज्योती झा म्हणाल्या, छोट्या कथांमधून मी मानवी भावभावनांच्या अभिव्यक्ती उलगडत गेले. त्यातूनच अनुवादात्मक साहित्याकडे देखील वळले. महिला सबलीकरण याविषयीही मी साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. तसेच आपण जन्मापासून ऐकत, बोलत असतो तरीही सहज संवाद म्हणजे काय हे आकलन होत नाही. या करिता साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. पुस्तक जत्रा व साहित्य मेळाच्या माध्यमातून इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लेखकांच्या भेटीगाठी होतात आणि वैचारिक अदानप्रदान होते, म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व आहे, असे ज्योत्स्ना बिडवे म्हणाल्या.

गरीमा गुप्ता म्हणाल्या, शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याचे महत्त्व असल्याने मनाविषयी लिहावे यातून मनोवैज्ञानिक भूमिका मांडत गेले. ज्या योगे मानसशास्त्रासारखा क्लिष्ट विषय सामान्य वाचकांपर्यंत सोप्या शब्दात मांडला.
सोनल अग्रवाल म्हणाल्या, मानवी स्वभावाप्रमाणे दुसऱ्याचे चांगले पाहणे, त्याच्या चांगल्या परिस्थितीचे कौतुक करणे या पलिकडे जाऊन, विचार करून आपल्यातील चांगल्या बाजू पहाव्या या विचारातून लिहिती झाले. ब्रिगेडिअर प्रथमेश रैना म्हणाले, लिखाणाचे बीज मला कुटुंबाकडूनच मिळाले आहे. कलम 370 च्या आधीच्या व नंतरच्या काश्मिरी जनतेची सत्य परिस्थिती, तेथील दु:ख, ताणतणाव, दहशत स्वत: अनुभवलेली असल्यामुळे ती मांडण्यासाठी मी लिहिता झालो.

प्रा. अतुल बेंगेरी म्हणाले, तंत्रज्ञान आणि भावभावना यांच्यातील दुवा साधत शैक्षणिक क्षेत्रात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देत शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी उपयुक्त साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. तसेच अनिकेत सोमण म्हणाले, मी ११ वर्षांचा असल्यापासून लिखाण करत आहे. लहान वयातच मनात लेखनाचे बीज रुजल्यामुळे मी लिखाणाचा छंद जोपासला. लेखकांचा सत्कार संयोजक पी. एन. आर. राजन यांनी केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस म्हणाले, इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांनी अनुवादाकडे वळावे. ज्या योगे भारतीय स्थानिक भाषांमधील उत्तमोत्तम साहित्यकृती, सकस लिखाण जगाच्या पाठीवर जाणे सहजतेने शक्य होईल. या परिसंवादात देशाच्या विविध भागातील लेखक सहभागी झाले याचा आनंद आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×