जागेच्या वादातुन तरुणाचा केला खून, मोहोळमधून चौघांना अटक

२४ तासांत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या, पुण्यातील आंबेगाव पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – जागेच्या वादातून तरूणावर धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा खून केल्याची घटना कात्रज परिसरातील ओमसाई मित्रमंडळानजीक घडली होती. याप्रकरणी हल्लेखोर टोळक्याला आंबेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात शोधून मोहोळ (जि. सोलापूर) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. अमर दिलीप साकोरे (वय ४० रा. संतोषनगर, कात्रज) मंदार मारुती किवळे (वय ३५ रा. नवीन वसाहत, कात्रज) गिरीष सुभाष बाबरे (वय २६, रा संतोषनगर, कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५ रा. खोपडेनगर कात्रज, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा. कात्रज) असे खून केलेल्या तरूणाचे नाव आहे. हा खून २० एप्रिलला पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास झाला होता.

मोक्कामॅन ते कैद्यांनी अभुवेला हळवा अधिकारी; अमिताभ गुप्ता…सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम चव्हाण राहत असलेल्या ठिकाणी मोकळा प्लॉट होता. त्या जागेवरून आरोपी आणि त्यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून टोळक्याने २० एप्रिलला पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास शुभमला गाठले. त्याला बेदम मारहाण करीत त्याचा खून केला होता. घटनेप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे खून करून पसार झालेले आरोपी मु. कामती खु (ता मोहोळ) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे यांनी मोहोळ येथे जावुन तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हे मंगळवेढा ते सोलापुर हायवे रोडवर, समाधान हॉटेल समोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, एपीआय स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, हरीश गायकवाड,, आदिनाथ देवकर, प्रकाश विटेकर यांनी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर करीत आहेत.

जागेच्या वादातून तरूणाचा खून करणार्‍या टोळीला अटक केली आहे. खूनाच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात आंबेगाव पोलिसांनी तपासाला गती देत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. – स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top