आरोपीला हैद्राबादमधून अटक, पुणे सायबर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – अभ्यासात तल्लख असलेल्या पठ्ठयाने लंडनमध्ये पीएचडी केली. त्यानंतर हिंदुस्थानात येउन त्याने युपीएससीची मुख्य परिक्षा पास केली. मात्र, कौटुंबिक वाद आणि ऑनलाईन जुगाराचा लागलेल्याने नादात त्याने सर्वस्व गमाविले. मग थेट आयआयटी बॉम्बेमधील प्रोफेसर असल्याची बतावणी करीत त्याने पुण्यातील थेट एमआयटी सारख्या संस्थेला ड्रोन प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल अडीच कोटींचा गंडा घातला. अखेर पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी हैद्राबादमध्ये धाव घेत सराईताला अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी
सितैया किलारू (वय ३४ रा. हैद्राबाद, तेलगंणा ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून १० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, ४ मोबाइल, टॅब, लॅपटॉप, एक लाखांचे दागिने, अलिशान मोटार असा ४९ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, यापुर्वी त्याच्याविरूद्ध सर्वाधिक आयटी अॅक्टसह इतर ८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो २०१० मध्ये इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलीकम्युनिकेशनमधून इंजिनिअर झाला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याने लंडन गाठून पीएचडी मिळविली होती.
आयआयटी मुंबईतील प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील पौड रस्ता परिसरातील एमआयटी संस्थेची एकाने २ कोटी ४६ लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ६ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने आयआयटी मुंबईतील प्रतिष्ठित प्राध्यापकाचे नाव वापरून एआय ड्रोन प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले. चौकशीत प्राध्यापक नसून, हैद्राबादमधील सितैया किलारू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी मच्छिद्र खाडे, वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, संदीप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंडे, संदीप कारकुड, टीना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, गंगाधर काळे, अदनान शेख, सतीश मांढरे, कृष्णा मारकर यांनी केली.
आरोपीने चलाखीने शैक्षणिक संस्थेला प्रकल्प देण्याच्या नावाखाली आर्थिंक गंडा घातला होता. मात्र, याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अतिशय चिकाटीने तपास करीत त्याचा शोध घेत अटक केली आहे. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर गुन्हे शाखा






















