अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ भागात घडली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजू सोपान अवचार (वय ४३, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत अवचार यांचा मुलगा कृष्णा अवचार (वय २८) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी स्वप्नील विकास बनकर (वय ३०, रा. भोसलेनगर, हडपसर), रघुनाथ बबन खोपकर (रा. फातिमानगर, वानवडी), संतोष बाबुराव राठोड (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अवचार बांधकाम मजूर आहेत. हडपसरमधील काळेपडळ परिसरात जेएसपीएम महाविद्यालयामागे नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहेत. रविवारी (१३ एप्रिल) अवचार हे गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावर काम करत होते. दुपारी तीनच्या सुमारास चौथ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अवाचार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम मजूर अवचार यांना हेल्मेट, पट्टा अशी सुरक्षाविषयक साधने न दिल्याने, तसेच पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.