शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – महानगरपालिकेच्या शिवाजीनगर मुख्य इमारतीत (मनपा भवन) महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि .८) दुपारी घडली. यामुळे महापालिकेत चांगलाच गोंधळ उडाला होता. तर, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कविता पटेकर (रा. मांगडेवाडी, कात्रज) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिका कर्मचारी राकेश विटकर (५३) यांनी तक्रार दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
ऑन ड्यूटी नशेत धिंगाणा; पुण्यात दोघे पोलीस तडकाफडकी निलंबित – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक, क्रीडा व सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आपल्या दालनात शासकीय कामकाज पाहत होत्या. यावेळी आरोपी महिला पटेकर हिने कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय राऊत यांच्या दालनात प्रवेश केला. दालनात शिरल्यानंतर आरोपीने उपायुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली. मोठ्या आवाजात आरडाओरडा आणि अरेरावीची भाषा वापरत तिने कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली आणि काही काळ कार्यालयीन कामकाज पूर्ण ठप्प झाले. गोंधळ सुरू असतानाच, आरोपी महिलेने आपल्या मोबाईलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून महिला अधिकाऱ्याची आणि पालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.





















