Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

marathinews24.com

रायगड – “मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन – सविस्तर बातमी

या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; 'मिसिंग लिंक' म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदित तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, एमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रकल्पाबाबत माहिती देताना​ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर ५० मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर ३०० मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे ‘कनेक्टर्स’ तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर २४ तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट त्यांच्या घरामध्ये ई-चलन पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

​अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले. कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज ७ हजार १८१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

विशेष म्हणजे हा प्रकल्प ज्या उंबरखिंडीच्या परिसरात साकारला आहे, तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांचा पराभव केला होता, या ऐतिहासिक संदर्भाची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भातील व्हिडिओचा संदर्भ देत त्यांची व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. “सुप्रिया ताई, तुम्ही आज शेवटच्यांदा वाहतूक कोंडीत अडकलात, आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशाला घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे कौतुक केले. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या यशामध्ये सर्व स्तरावरील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. हा प्रकल्प म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, ज्या-ज्या हातांनी यात हातभार लावला त्या सर्वांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.विशेषतः कोविडच्या काळात जेव्हा अनेक आव्हाने समोर होती, तेव्हा एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी बॅकलॉग भरून काढत हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. एकेकाळी हा प्रकल्प रद्द करण्याचा किंवा न होण्याचा विचार सुरू होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि कामाला सुरुवात केली. श्री.शिंदे यांनी आठवण करून दिली की, प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी ते स्वतः एमएसआरडीसी मंत्री होते आणि आज लोकार्पणाच्या वेळीही हे खाते त्यांच्याकडेच आहे, हा एक दुर्मिळ योगायोग आहे. राज्यातील राजकीय बदलांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात या कामाचा वेग मंदावला होता, परंतु चार वर्षांपूर्वी झालेल्या ‘अभियांत्रिकी आणि राजकीय चमत्कारा’मुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाला गती मिळाली आणि सर्व अडचणी दूर झाल्या. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ ७-८ तासांत पोहोचता यावे, यासाठी सरकार ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जसा सुखकर झाला, तसाच आता पुणे प्रवासही सुसाट आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेने महायुतीला नेहमीच आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाच्या जागतिक विक्रमावर विशेष भर दिला. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेला २३.५ मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा ठरला असून, त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचे सांगत, त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचा आज सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठला गेल्याची भावना व्यक्त केली. या प्रकल्पाच्या नियोजनात उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचेही मोठे योगदान असून त्यांनी अर्थसंकल्पात केलेली घोषणा आणि वेळोवेळी घेतलेला आढावा यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पर्यावरण आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, घाटातील तीव्र वळणे टाळल्यामुळे इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज सुमारे एक कोटी रुपयांची बचत होणार आहे. यामुळे केवळ प्रदूषणात घट होऊन पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर अपघात कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल. हा मार्ग उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी विकासाची नवीन कवाडे उघडणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि आधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे हा मार्ग भविष्यात ‘स्मार्ट एक्सप्रेस-वे’ म्हणून ओळखला जाईल, असे सांगून त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विशेष आभार मानले.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्प बाबत सविस्तर माहिती….

सन २००२ मध्ये मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण दुतगती मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, सन १९९६-९७ मध्ये आखणी करताना खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) दरम्यानची १३.३० कि.मी. लांबीची मिसिंग लिंक’ प्रस्तावित असली तरी आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे ती त्या वेळी पूर्ण करता आली नाही.

परिणामी, अस्तित्वातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सुमारे १९ कि. मी. रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचा वापर दुतगती मार्गाच्या सामायिक भाग म्हणून करण्यात आला.

सुरक्षित व गतिमान प्रवासासाठी ‘मिसिंग लिंक

द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यानचा रस्ता सध्या सहा पदरी आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्गाच्या सहा पदरी मार्गासोबत राज्य मार्गाच्या चार पदरी मार्गाची वाहतूक एकत्र येऊन एकूण दहा पदरी वाहतूक निर्माण होते. घाट विभाग असल्याने येथे चढ-उतार जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन अनेकदा बंद ठेवावी लागते. या अडचणी दूर करण्यासाठी आणि अधिक सक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरपैज दरम्यानच्या ५.८६ किमी लांबीच्या सहापदरी रस्त्याचे आठ पटरीकरण करण्यात आले आहे. तसेच खोपोली एक्झिट ते कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूट या १२.३० किमी लांबीच्या उर्वरित भागासाठी दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट उभारण्यात आले आहेत. ५.८८ किमीच्या ८ पदरी स्टीकरणासह एकूण १९.१६ कि. मी. लांबीचा हा अत्याधुनिक मार्ग विकसित करण्यात आला आहे. दि. २९ ऑगस्ट २०१८ रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी रु. ६८९५, ३६ कोटीच्या भांडवली खर्चास तसेच स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती

जगातील सर्वाधिक रुंद बोगद्‌यांची निर्मिती….

या प्रकल्पातील दोन बोगद्‌यांची उभारणी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NAIM) तंत्रज्ञाना‌द्वारे करण्यात आली आहे. प्रत्येकी २३.५० मीटर रुंदीचे हे बोगदे सहयादी पर्वतरांगांमध्ये खोदणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून यांची गिनीज बुकमध्ये होण्याकरिता प्रक्रिया सुरु आहे बोग‌द्यांमधील विविध प्रकारच्या खडकांचे भूगर्भशास्त्रीय परीक्षण करून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. बोगदा क्रमांक १ ची लांबी १.५८ कि. मी. असून बोगदा क्रमांक २ ची लांबी ८.८६ कि. मी. आहे. विशेष म्हणजे, दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे १८० मीटर खाली आहे. त्यामुळे ब्लास्टिंगसारख्या कामांमध्ये मोठे तांत्रिक आव्हान होते; मात्र एमएसआरडीसीने ते यशस्वीरित्या पूर्ण केले.

टायगर व्हॅलीतील केबल-स्टेड ब्रिज अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना

या दोन बोग‌द्यांना जोडणारा टायगर व्हॅलीतील ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज हा या प्रकल्पाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. सुमारे १२५ मीटर उंचीवर उभारण्यात आलेला हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. १८२ मीटर उंचीचे दोन पायलॉन (स्तंभ) आणि एकूण २४० केबल्सच्या सहाय्याने हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलासाठी विंड टनेल टेस्ट’, ‘फॅटिंग व टेन्साइल टेस्ट’ तसेच ‘स्टे केबल टेस्टा अशा अत्याधुनिक चाचण्या विदेशात करण्यात आल्या आहेत. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या परिसरात महाकाय यंत्रसामग्री पोहोचविणे, तसेच वेगवान वारे आणि मुसळधार पावसात काम करणे ही मोठी आव्हाने होती. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे पाळत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या नव्या मार्गामुळे घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच, वाहनांच्या इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज अंदाजे १ कोटी रुपयांची बचत होणार आहे. परिणामी, प्रदूषणातही लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील पुढील विकासासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांच्या प्रगतीसाठी मिसिंग लिंक प्रकल्प भविष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×