महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी प्रयत्न केले, त्यांना विनम्र अभिवादन
marathinews24.com
पुणे – स्वातंत्र्यानंतर भारतात भाषावार राज्यांची पुनर्रचना होत असताना मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी वाढू लागली. “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!” ही घोषणा लोकांच्या मनात रुजली. १९४६ पासून सुरू झालेल्या या चळवळीने मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानासाठी अनेक आंदोलन उभारले.
पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी
संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना आणि नेत्यांचा पुढाकार मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य आणि मुंबईसह महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. शंकरराव देव, केशवराव जेधे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी यांसारख्या नेत्याच्या पुढाकाराने हे परिषदे मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
आंदोलनाचा तीव्रतेचा टप्पा आणि हुतात्म्यांचे बलिदान
संयुक्त महाराष्ट्राची मागणी राज्यभर तीव्र होऊ लागली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दार कमिशन आणि नंतर स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन (SRC) नेमले. SRC च्या अहवालात मुंबई शहराला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची शिफारस केली गेली, जी मराठी भाषिकांना मान्य नव्हती. विरोधात संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आंदोलन तीव्र केले. मुंबई आणि मराठी भाषिक प्रदेशात निदर्शने, बंद आणि सत्याग्रह सुरू झाले. हे दडपण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार झाला. १६ जानेवारी १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन येथे १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या घटनेमुळे मराठी माणसांत रोषाची लाट उसळली.
लोकभागीदारी आणि विजय
संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आंदोलन गावोगावी नेले. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य मराठी माणूस मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. शेवटी, मराठी माणसाच्या दबावामुळे केंद्र सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य मान्य केले. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली.
आजची वास्तविकता: जागरणाची गरज
महाराष्ट्र हे संघर्षाने, त्यागाने, बलिदानाने निर्माण झालेले राज्य आहे; कोणाच्या उपकाराने किंवा उदारीने मिळालेले नाही. राज्याला ६६ वर्षे झाली तरी आज मराठी भाषेसाठी सक्तीची मागणी करावी लागते. “परप्रांतीय गेले तर मुंबई बंद पडेल,” असे विधान करणाऱ्यांना हिम्मत कोण देते? मराठी माणूस कमकुवत झाला का? आपले मराठी भाषिक लोक मराठी बोलत नाहीत, राज्यकर्त्यांना प्रश्न उपस्थित करत नाहीत, “आम्हाला काय पडलंय” म्हणून टाळतात.
ज्या लोकांनी मराठी शाळा बंद होताना तोंडावर कुलूप लावून बसले, राज्यकर्त्यांकडून काही तरी आपल्या पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने गप्प राहिले, त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! ज्यांना मराठी भाषेची सक्ती चुकीची वाटते, परप्रांतीयांबद्दल आपुलकी वाटते आणि मराठीसाठी लढणाऱ्यांना टोमणे मारतात, त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
कणखर देशा, दगडाच्या देशा, महाराष्ट्र देशा! समृद्ध महाराष्ट्र वगळता दुष्काळी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात, पण त्या शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहचला जात नाही या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
समृद्ध महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, कामगार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांकडून कामासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! मराठी भाषा महाराष्ट्रात टिकाव, अबाधित राहावयासाठी मराठी बोलणे आणि जपणे गरजेचे आहे. मराठी ही आपली ओळख आहे. मराठी ही आपली स्वाभिमान आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक – ओमप्रकाश आदमवाड






















