चंदननगर पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – आर्थिक फसवणूक प्रकरणात गेले दोन वर्ष फरारी असलेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईतील सानपाडा परिसरातून अटक केली.
प्राचार्याकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह दोघे अटकेत – सविस्तर बातमी
दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तक्रारदार हे येरवडा भागात राहायला आहेत. आरोपी तावरे याने कुक्कटपालन व्यवसायासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर तावरे याने तक्रारदाराकडे बतावणी केली. पत्नीला एका कार्यक्रमासाठी जायचे आहे. तुझ्या पत्नीचे मंगळसूत्र तीन दिवसांसाठी वापरायला दे, अशी बतावणी त्याने फिर्यादीकडे केली होती. फिर्यादीने त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र आरोपीला दिले. त्यानंतर आरोपी तावरेने हे मंगळसूत्र एका वित्तीय संस्थेत परस्पर गहाण ठेवले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीने अशाच पद्धतीने तिघांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. गेले दोन वर्ष तो गुंगारा देत होता. त्याने मोबाइल क्रमांक बदलला होता, तसेच बँक खातेही वापरणे बंद केले होते. तांत्रिक तपासात आरोपी तावरे हा नवी मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती चंदननगर पोलिसंना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सानपाडा परिसरातून अटक केली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, सहायक निरीक्षक महेश लामखेडे, गणेश जगदाळे, किरण घुटे, विक्रम गायकवाड यांनी ही कारवाई केली.





















