बनावट बियाण्यांना आळा; शेतकऱ्यांसाठी ‘साथी’ ठरणार डिजिटल व्यवस्था
marathinews24.com
पुणे – आपल्या देशात बियाण्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. विविध प्रकारचे तृणधान्ये, कडधान्ये, कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा प्रत्येक पिकांसाठी दरवर्षी प्रचंड प्रमाणावर बियाण्यांची देवाण-घेवाण होते. परंतु या मोठ्या व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. अनेकदा शेतकऱ्यांना कोणते बियाणे अधिकृत कंपनीचे आहे आणि कोणते बनावट आहे, कळण्यास अडचण निर्माण होत होती. बियाण्यांची पिशवी घेतल्यानंतर त्यामध्ये अपेक्षित गुणधर्म असतीलच याची हमी नसायची, परिणामी उत्पादन घटायचे व शेतकऱ्याचा खर्च वाया जायचा. शासनालाही बियाण्यांच्या उपलब्धतेची अचूक आकडेवारी मिळत नसे. एका जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा असताना दुसऱ्या जिल्ह्यात साठा पडून राहायचा. या सगळ्या अडचणींवर उपाय म्हणून साथी पोर्टलची निर्मिती करण्यात आली.
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा – सविस्तर बातमी
शेतकऱ्यांना वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि खात्रीशीर बियाणे मिळणे हे अन्नसुरक्षेसाठी आणि कृषी उत्पादनक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम गुणवत्तेच्या जनुकीयदृष्ट्या सुधारित बियाणांमुळे पीक उत्पादनात २० टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते. परंतु बहुतेक वेळी बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांचा पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या सहकार्याने Seed Authentication, Traceability and Holistic Inventory म्हणजेच साथी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलची अंमलबजावणी सन 2023 पासून टप्प्याटप्याने करण्यात आली असून 25 एप्रिल 2025 पासून सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
साथी पोर्टल केवळ माहिती व्यवस्थापनासाठी नसून शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत सर्व घटकांना जोडणारे, पारदर्शकता वाढवणारे आणि बियाण्यांच्या गुणवत्तेचे रक्षण करणारे एक सशक्त व्यासपीठ आहे. साथी पोर्टल हे एक डिजिटल आरसा आहे, ज्यामध्ये बियाण्याचा प्रवास स्पष्टपणे दिसतो. हे पोर्टल बियाणांच्या संपूर्ण प्रवासाची नोंद ठेवते. साथी प्रणालीनिर्मित सांकेतांक क्रमांकामुळे (क्युआर कोड) बियाण्याच्या उत्पादनाचा स्वतंत्र इतिहास शेतकऱ्याला सहज तपासता येतो. यामुळे ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण आणि कायदेशीर पालन सुनिश्चित होते.
बियाणे उत्पादक व वितरकांसाठी साथी पोर्टलची उपयुक्तता : पारदर्शकता आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढवते. बनावट, कालबाह्य व अनधिकृत बियाण्यांवर नियंत्रण ठेवणे, व्यवसाय सुलभता आणि व्यवस्थापन, कायदेशीर बाबींचे पालन करणे सुलभ, खर्चात व वेळेत बचत होण्यासह विक्री आणि वितरणावरील नियंत्रण, एकत्रित डेटा बँक तयार होते. तसेच वितरण साखळीचा ट्रॅक ठेऊन नियोजन शक्य, शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तात्काळ उपाययोजना शक्य, एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व व्यवहार, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेटवर्किंग, संस्थेचा ब्रँड व व्यवसाय दोन्ही वाढण्यास मदत होते.
बियाणे विक्रेत्यांनी https://seedtrace.gov.in/ या पोर्टलवर लॉगिन करावे. संकेतस्थळावर प्रवेश केल्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य’ निवडावे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड प्रविष्ट करून, कॅप्चा कोड टाकावा व लॉगिन करावे. प्रथमच लॉगिन केल्यानंतर वापरकत्यांनी सर्वप्रथम आपली प्रोफाईल अद्ययावत करावी. या पोर्टलवर खरेदीदारांचे विक्रेते, शासकीय संस्था आणि शेतकरी असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बियाणे विक्री करतांना फार्मर आयडी नमूद करावा. फार्मर आयडी नमूद उपलब्ध नसल्यास शेतकऱ्याचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. त्यानंतर साठा निवड व बियाणे विक्रीसाठी विक्रेते, शासकीय संस्थेच्या बियाणे विक्री कार्यपद्धतीचा अवलंब करुन शेतकऱ्यांना बियाणे विक्री करावे.
राज्यातील बियाणे उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या संघटनांचे (सियाम, मासा व माफदा) सूचनांनुसार साथी पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये लॉट-निहाय ट्रॅकिंग प्रणालीची अंमलबजावणी, प्रत्येक बियाणे बॅग स्वतंत्र स्कॅन करण्याची आवश्यकता नसलेली सुलभ विक्री प्रक्रिया, ईआरपी प्रणाली (उदा. टॅली) सोबत एकत्रीकरण, ॲग्रीस्टॅक एपीआयद्वारे फार्मर आयडी आधारित माहितीची स्वयंचलित उपलब्धता, बाह्य सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांसाठी बिलिंग प्रक्रिया अकार्यान्वित करण्याची सुविधा, “SATHI-SaleEasy” मोबाईल अॅपद्वारे सुलभ विक्री नोंद, तसेच बियाणे (नियंत्रण) आदेश, १९८३ अंतर्गत फॉर्म “D” सादरीकरणाची सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय, बियाणे साठा परतावा प्रक्रियेतही संघटनेच्या सहमतीनेच आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
डॉ. प्रीती सवाईराम ,कृषी उपसंचालक (बियाणे ),कृषी आयुक्तालय: “योग्य बियाणे – योग्य वेळी – योग्य शेतकऱ्यापर्यंत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वय, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत उत्पादनक्षमता वाढविणे शक्य होईल. “




















