अंबाजोगाईतील घटना
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात नवविवाहित तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२५) घडली आहे. गणेश दत्तू कोळी (वय २८, मूळ रा. नांदुर्गा, ता. औसा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
केज तालुक्यात बेलगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस – सविस्तर बातमी
गणेश कोळी हे चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. अवघ्या १२ दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नी कर्तव्यावर गेलेली असताना त्यांनी गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे . मात्र आत्महत्येचे नेमके कारण काय आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणेश कोळी यांचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील दिपाली यांच्याशी झाला होता. दिपाली या अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांनी मोरेवाडीत भाड्याने खोली घेतली होती. सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास, पत्नी ड्युटीवर गेलेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झाला नसून, मंगळवारी (दि.२६) शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गणेश यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.





















