समाजमाध्यमांवर छायाचित्र व्हायरल; वनविभागाने घेतली दखल
marathinews24.com
पुणे – सिंहगड परिसरात ‘अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी’ अशा आशयाचा फलक लावण्याचा प्रकार उघडकीस आला. वनविभागाने संंबधित फलक हटविला आहे. सिंहगडावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहनतळाच्या वादग्रस्त फलक लावण्याचा प्रकार मंगळवारी (१४ जुलै) उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित फलक हटविला.
डाॅक्टरांकडे खंडणी मागणारा गुंड गजाआड – सविस्तर बातमी
संबंधित फलकाचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मिस फराह चॅरिटेबल फाऊंडेशनकडून ईमेलद्वारे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक शुभम कुमार, हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली.
’ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वादग्रस्त फलक लावणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सिंहगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपाासण्यात येणार आहे. फलक लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे’, असे मिस फराह फाऊंडेशनकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी वाहनतळाजवळ वादग्रस्त फलक लावल्या प्रकरणी अद्याप वनविभागाकडून पोलिसांकडे अधिकृत तक्रार देण्यात आली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल. फलक लावणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
– राजेश रामाघरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे






















