कर्मचाऱ्याला धमकावून दोन मोबाइल व दुचाकी लंपास
marathinews24.com
पुणे – खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला धमकावून लुटण्यात आल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात दहीहंडीत विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चंदननगर भागातील एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. ४ सप्टेंबर रोजी तक्रारदार तरुण दुपारी सव्वादोनच्या सुमारास दुचाकीवरुन निघाला होता. खराडी बायपास रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले. त्याला धमकावून दोन मोबाइल घेतले. त्यानंतर तरुणाची दुचाकी ताब्यात घेऊन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.
आंदेकर टोळीतील गुंड अटकेत
नाना पेठेतील गुंड बंडू आंदेकर टोळीतील सराइताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. अक्षय दशरथ अकोलकर (वय ३३, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार महेंद्र तूपसौंदर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोलकर याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अकोलकर हा नागझरी नाल्यात थांबला होता. त्याच्याकडे तीक्ष्ण शस्त्र असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानतंर पोलिसांनी सापळा लावून अकोलकर याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. हवालदार जाधव तपास करत आहेत.




















