उपचारादरम्यान २२ वर्षीय राहुल जंवजाळचा मृत्यू, आरोपी मित्राला अटक
marathinews24.com
पुणे – आर्थिक वादातून शिवीगाळ केल्याने तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यातील वसुलीवाल्या पोलिसाची आयुक्तांना गुगली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष अणि राहुल हे मित्र आहेत. आशिष हा ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आशिष आणि राहुल यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगरमधील बोराटे वस्ती परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्या वेळी राहुलने त्याला आईवरुन शिवी दिली. या कारणावरुन आशिष चिडला. त्याने त्याच्याकडील चाकूने राहुलवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी (१० सप्टेंबर) आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करत आहेत.




















