फ्लॅटमधून २ लाखांचा ऐवज चोरीला
marathinews24.com
पुणे – फ्लॅटच्या दरवाज्यासमोरील पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे एका महिलेला महागात पडले. चोरट्याने चावी चोरुन सदनिकेचे कुलूप उघडले. कपाटातून रोकड, तसेच दागिने असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कात्रज भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केसनंदच्या माजी सरपंचाला मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला आंबेगाव बुद्रुक भागातील गणराज दर्शन सोसायटीत राहायला आहेत. महिला आणि कुटुंबीय कामानिमित्त सकाळी बाहेर पडल्यानंतर सदनिकेला कुलूप लावून चावी दरवाज्यासमोरील पादत्राणांच्या जाळीत ठेवायची. चोरट्याने जाळीत ठेवलेली चावी चोरली. महिला आणि कुटुंबीय कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर सदनिकेचे कुलूप उघडले. शयनगृहातील कपाटातून रोकड, सोन्याचे दागिने असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.
महिलेच्या सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत. स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात गेल्या वर्षी सदनिकेच्या बाहेर ठेवलेली चावी चोरून चोरट्यांनी २९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली होती.
वाघोली, लोहगावमध्ये दुकानात चोरी
वाघोली आणि लोहगाव परिसरातील दोन दुकानांचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कपडे, रोकड, वायर बंडल असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. लोहगाव परिसरातील धानोरी जकात नाका भागात असलेल्या हार्डवेअर दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी वायरचे १३ बंडल, गल्ल्यातील रोकड असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत एका व्यावसायिकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार गायकवाड तपास करत आहेत. वाघोली भागातील एका वस्त्र दालनातील छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड, कपडे असा २४ हजार रुपयांचा माल लांबविला. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.
























