‘विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्या’, ६ मुख्य मागण्यांसह कंत्राटीकरणाविरोधात एल्गार
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आज, ७ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आगामी काळात तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.
साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉस – सविस्तर बातमी
आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या ६ प्रमुख मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला. यामध्ये MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, ७० हजार जागांची मेगा भरती त्वरित लागू करावी, तसेच नवीन अध्यक्षांची नेमणूक करताना पारदर्शकता पाळून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीचीच निवड केली जावी, पण व्यक्ती बदलून चालत नाही, तर संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल असे त्यांनी म्हटले. एक चोर गेला, तर दुसरा चोर येतो असा टोलाही त्यांनी लगावला. याशिवाय MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, विविध परीक्षांच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीने (SIT) निष्पक्षपातीपणे तपास करावा आणि राजस्थान सरकारच्या धर्तीवर अवघ्या १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, या मागण्या त्यांनी मांडल्या.
सरकारी नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून बहुजन, शेतकरी, वंचित आणि शोषित समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहातून बाहेर फेकण्याचा डाव आखला जात आहे. अशा कंत्राटी पद्धतीमुळे या घटकांतील मुले कधी अधिकारी होऊ शकतील का?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. कंत्राटीकरणाच्या या धोरणाविरोधात आता सर्वांनी एकवटून लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
























