पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला
marathinews24.com
दौंड – Daund Murder Case : तालुक्यातील डाळिंब गावातून एकाचे अपहरण करुन खून करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खून प्रकरणाचा छडा लावला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला मोठा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. शिवीगाळ केल्याने खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी विजय सुभाष लेचरुड (वय ४०, रा. डाळिंब, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. भीमाशंकर धोंडिबा खंडागळे (वय ३५, रा. डाळिंब, ता. दौंड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत भीमाशंकर याची आई नंदा (वय ५२) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना सीबीआय कोठडी – सविस्तर बातमी
भीमाशंकर हा ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडला. तो रात्री उशीरापर्यंत घरी परतला नाही. त्याची आई नंदा यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली. अपहरण केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत होता. मुलाचा शोध न लागल्याने कुटुंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. Daund Murder Case तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयावरुन आरोपी विजय याला ताब्यात घेतले. चैाकशीत आरोपीने शिवीगाळ केल्याने भीमाशंकरला मारहाण केली, तसेच त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती मिळाली. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी डाळिंब गावातील एका शेतात असलेल्या विहिरीत भीमाशंकर याचा मृतदेह मोठा दगड बांधून टाकून दिल्याचे उघडकीस आले.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक निरीक्षक नितीन अतकरे, उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले, ज्ञानेश्वर राऊत, बाळासाहेब थिकोळे, सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, संदीप देवकर यांनी ही कामगिरी केली.




















