काॅलसेंटर चालकासह २० जण अटकेत
marathinews24.com
पुणे – Lonavala Fake Call Center : अमेरिका, कॅनडासह विविध देशांतील नागरिकांकडे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या काॅल सेंटरवर लोणावळा पोलिसांनी छापा टाकला. लोणावळ्यातील नांगरगाव भागात सोसायटीतील बंगल्यात सुरू असलेल्या कॉल सेंटरवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली. कारवाईत लॅपटॉप, मोबाइल, वाहने आणि रोकड असा मिळून ३६ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मैत्रीणीसोबत झाला वाद, तिच्या भावडांनी तरुणावर केला वार – सविस्तर बातमी
अमान इंमतीया शेख, मोहम्मद फैज उर्फ नाजिश आरीफ शेख, मोहम्मद अफजल शेख हर्शद शेख, कुलदीप मनोज बागडी, रिहान सलम घनानी, मोहम्मद अलीरजा सययद, तावीश मेहबुबआली शेख, कामरान इसामुदीन शेख, सदाम चाँद खान, सुजल खुमबहादुर राणा, अब्दुल आहात मोहम्मद रफिक खान, झाहिद वाहिद शेख, जाहीद आजम शेख, धनराज देवजीत बोस, शादाब जावैद सययद, इरफान अब्दुल गफुर खान समीर इरफान षेख, इरशाद इरफान शेख, अमिर सिराज खान मकसुद शमिम चौधरी यांना अटक करण्यात आली. आरोपी हे १९ ते २६ वयोगटातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील ओमेगा सोसायटीत देव व्हिला हा बंगला आरोपींनी भाडेतत्त्वावर घेतला होता. तेथे बेकायदा कॉल सेंटर सुरू केले. परदेशातील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. लॅपटॉप आणि मोबाइलवरील विविध ॲपचा वापर करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येत होता. नामांकित कंपन्यांचे बनावट दस्तऐवज आणि ओळखपत्रे तयार करून संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवले जात होते. बतावणी करुन परदेशातील नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवले जात होते. त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती, तसेच बँक खात्यांशी संबंधित तपशील मिळवले जात होते.
काही नागरिकांना त्यांच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याची भीती दाखवून पैशांची मागणी करण्यात येत होती. क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेतल्यानंतर परस्पर बँक खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वळविण्यात येत होते. (Lonavala Fake Call Center) लोणावळा शहर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. तपासात आरोपी इरफान अब्दुल गफूर शेख हा कॉल सेंटरचा मालक असून, फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. मोहम्मद फैज ऊर्फ नाजिश आरिफ शेख याच्या मदतीने हे कॉल सेंटर चालवले जात होते. परदेशातील नागरिकांकडून फसवणुकीच्या माध्यमातून उकळलेली रक्कम हवाला आणि आभासी चलनाच्या माध्यमातून भारतीय चलनात मिळवली जात असल्याची माहिती तपासात मिळाली.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात २० आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, खंडणी तसेच अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलीग्राफ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश विधाते आणि पथकाने ही कारवाई केली.




















