१३ गुन्हे उघडकीस, २१ लाखांचा ऐवज जप्त
marathinews24.com
पुणे – Pune Ganeshotsav Theft Case : शहरात गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरणार्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून तब्बल १४० ग्रॅम सोन्याचे दागिेन, मोबाइल, चाकू, कटर, असा मिळून २१ लाख २१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीने केलेल्या सोनसाखळी चोरीसह मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. विजयपाल कवर सैन (वय ३४) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पुण्यात दुकानांचा पत्रा उचकटून चोरी करणारा गजाआड – सविस्तर बातमी
आरोपी सैन याने ५ साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तक्रारदार सागर कोमटी आणि त्यांचा मित्र विक्रांत शिंदे हे २५ सप्टेंबरला गणपती विसर्जन दिवशी बेलबाग चौकात मिरवणूक पाहत होते. त्यावेळी सहा जणांच्या टोळीने गर्दीचा फायदा घेत सागरच्या पँटच्या खिशातील मोबाईल चोरला. त्यानंतर टोळीने दोघांना पकडून हाताने मारहाण केली. (Pune Ganeshotsav Theft Case) चाकूचा धाक दाखवून सागरच्या गळ्यातील १ लाख २१ हजारांची सोन्याची चैन, मोबाइल असा दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेशोत्सवात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या.
फरासखाना पोलीस तपास करीत असताना पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांना हा गुन्हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील इस्लामपूर घसौली येथील टोळीने केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी जाउन विजयपाल सैन याला ताब्यात घेतले. त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी सचिन हिरे, वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस निरीक्षक राजेश महाला, एपीआय अनिल सुरवसे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, अविनाश दरवडे यांनी केली. पुण्यात गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेउन चोर्या करणार्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त केला आहे. – कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक




















