आरटीओच्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Rapido Case Pune : बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक प्रसाद सुरवसे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ‘रॅपिडो’ कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (३), मोटार वाहन कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रोच्या कामानिमित्त कात्रज चौकात जड वाहनांना बंदी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ‘बाईक टॅक्सी’ला (पेट्रोल इंजिन असलेली दुचाकी) प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली नाही. ‘रॅपिडो’ कंपनीकडून प्रवासी वाहतुकीबाबतचे ॲप तयार करण्यात आले. (Rapido Case Pune) या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली. बेकायदा प्रवासी वाहतूक करुन शासनाची फसवणूक केल्याचे मोटार वाहन निरीक्षक सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.




















