अमेरिकेत राहणाऱ्या मुलाच्या नावाने पार्सल आल्याचे सांगून ओढले जाळ्यात
marathinews24.com
पुणे – Pune Courier Scam : अमेरिकेत राहणाऱ्या मुलाच्या नावाने कुरिअर पार्सल आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख २३ हजार २१९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक निवृत्त प्राचार्य आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात खंडणी बहाद्दरांना दिले जातेय अभय – सविस्तर बातमी
तक्रारदार कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्याजवळील कुबेरा कॉलनी परिसरात राहतात. २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाच्या नावाने पार्सल पाठवण्यात आल्याचे सांगून चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या कस्टमर केअरचा क्रमांक शोधण्यास सांगण्यात आले. संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला. या वेळी संबंधित व्यक्तींनी आपण कुरिअर कंपनीच्या कस्टमर सपोर्टमधून बोलत असल्याचे भासवले.
चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या दोन्ही मोबाइलमध्ये एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. (Pune Courier Scam) त्यानुसार त्यांनी ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरून घेण्यात आला. दरम्यान, त्यांच्या मुलाच्या व्हॉट्सॲप खात्यावरून आलेल्या संदेशात दोन्ही मोबाइल हॅक करून त्यांचा ॲक्सेस घेतला जात असल्याचा प्रकार घडला. या सगळ्या प्रकारादरम्यान चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख २३ हजार २१९ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.




















