कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह-खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
marathinews24.com
पुणे – Baramati Rana Suryawanshi Attack : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असतानाच बारामतीत उद्योजकावर गोळीबार करून कोयत्याने वार केल्याची घटना कटफळ गावाजवळ घडली आहे. हल्ल्यात संबंधित उद्योजक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बारामतीमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे.
पोलिसांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावली; पोलिसांना अरेरावी करणारा जेरबंद – सविस्तर बातमी
राणा शिपिंग कंपनीचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती राणा सूर्यवंशी (वय ४१ रा. मगरपट्ट, हडपसर पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. बारामती विमानतळ परिसरात प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Baramati Rana Suryawanshi Attack हल्ल्यात राणा सूर्यवंशी गंभीर जखमी झाले आहेत. बारामती येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उद्योजक राणा सूर्यवंशी हे पुण्यात मगरपट्टा परिसरात राहायला असून, त्यांचा शिपिंगचा व्यवसाय आहे. त्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात परिचित आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभागामुळेही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असणारे राणा सूर्यवंशी मागील काही महिन्यात चर्चेत आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गरिबांसाठी रुग्णालयात उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी बांधलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
सरकार आणि गृहमंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न- खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकार आणि गृहमंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्या का आणि पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याबाबतची उत्तरे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.




















