कोंढवा पोलिसांच्या ‘दामिनी मार्शल पथकाची उत्तम कामगिरी
marathinews24.com
पुणे – महिन्याला फक्त ७ हजार रुपये पगारात घर चालवणार्या एका कष्टकरी महिलेला घराच्या दुरुस्तीसाठी साठवलेले ५ हजार रुपये कोंढवा पोलिसांच्या ‘दामिनी मार्शलने’ परत मिळवून दिले आहेत. महिला पोलीस अंमलदार दामिनी मार्शल ए. डी. चेचर यांनी वाद मिटवून महिलेला मदत केली. एनआयबीएम रोड परिसरात राहणार्या मनीषा (वय ४०) यांनी घराच्या दुरुस्तीसाठी ३ एप्रिल २०२५ रोजी गिरिधर नावाच्या (वय ४२) एकाला ५ हजार रुपये दिले होते. मात्र अनेक आठवडे उलटूनही त्याने कोणतेही काम सुरू केले नाही. उलट मनीषा यांचे कॉलही त्याने ब्लॉकमध्ये टाकले होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एका व्यक्तीवर स्थानबद्धेची कारवाई – सविस्तर बातमी
निराश झालेल्या मनीषा यांनी २७ जून रोजी ‘दामिनी मार्शल’ पथकाला कॉल करून मदत मागितली. पोलीस अंमलदार ए. डी. चेचर यांनी तत्काळ प्रतिसाद देत गिरिधर याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर पोलिसांनी खडसावून विचारणा केल्यावर त्याने पैसे घेतल्याची कबुली दिली. त्याला दोन दिवसांची मुदत देऊन ५ हजार रुपये परत करण्यास सांगण्यात आले. शेवटी गिरिधरने मनीषा यांना संपूर्ण रक्कम परत केली. या रकमेवर माझ्या घराचे स्वप्न होते. ती रक्कम मला परत मिळाली याचा मला खूप आनंद आहे, असे भावनिक उद्गार मनीषा यांनी काढले आहेत. त्यांनी दामिनी मार्शल पथकाचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी मदत चेचर यांनी केली.























