३ जणांवर शस्त्राने वार
marathinews24.com
पुणे – अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा – सविस्तर बातमी
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. वाडकर मळा, महंमदवाडी, काळेपडळ पोलीस ठाण्याजवळ, मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार, साठे, पंडीत हे मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी उणेचा आणि साथीदारांकडून मेफेड्रोन खरेदी करण्यासाठी गेले होते. रास्ता पेठेतील सिटी चर्चसमोर आरोपींनी त्यांना भेटायला बोलाविले होते. आरोपींनी पवार याच्याकडून पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याला मेफेड्रोन दिले नाही. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पवार, साठे, पंडीत यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. याघटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.























