पुण्यातील नाना पेठेतील गँगवार
marathinews24.com
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (Ayush Komkar Crime) ( वय १९, रा.नाना पेठ) याचा शुक्रवारी( दि.५) रात्री दोघांनी गोळ्या झाडून खुन केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल १२ गोळ्या झाडल्या. त्यापैकी ९ गोळ्या आयुषच्या शरीराचा वेध घेतल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यश पाटील आणि अमित पाटोळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीत हातसफाई; मोबाइल चोरणारे दोघे अटकेत, १३ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी
आरोपींनी पूर्व नियोजित कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी घटनास्थळी अमित पाटोळे व सुजल मेरगु हे हजर होते. गोळीबारानंतर इथे फक्त बंडु आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच असे म्हणून आरोपींनी दहशत निर्माण केली. घटनास्थळी पोलिसांना १२ रिकाम्या पुंगळ्या आणि एक अर्धवट काडतुस सापडले. शवविच्छेदन अहवालात आयुषच्या मृतदेहात ९ गोळ्या आढळल्या असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. आयुषने घातलेल्या जर्किगची गोळ्यांनी चाळण केली होती. त्याच्या जर्किंनच्या उजव्या कॉलरवर, उजव्या खिशाचे वर, चैनच्या बाजूला, डाव्या आणि उजव्या बाहीवर, पाठीमागील बाजुला, कॉलरच्या पाठीमागील बाजूस, डाव्या बाजूच्या कॉलरखाली अशा प्रकारे जर्किंनच्या विविध ठिकाणी गोळ्या लागल्याचे दिसून आले.
गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेले पिस्टल जप्त करायची आहेत. हे पिस्टल व काडतुसे कोठून आणली आहेत, त्यांना कोणी पुरविली आहेत, त्यांचा तपास करायचा आहे. गुन्हा करण्याचा आरोपींचा मुख्य उद्देश काय होता, याचा सखोल तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर प्रथमवर्ग
न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी दोघा आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे.
गावठी पिस्टलमध्ये असतात १० राऊंड
पोलीस अनेकदा पिस्टल बाळगणाऱ्याना पकडतात. त्यांच्याकडून एखादे पिस्टल आणि जोडीला एक किंवा दोन काडतुसे सापडतात. आयुष कोमकर याच्यावर दोघांनी एकाचवेळी दोन पिस्टलमधून १२ गोळ्या झाडल्या. त्यामुळे पिस्टलमध्ये नेमक्या किती राऊंड असतात, याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, पोलिसांकडे असलेल्या पिस्टलमध्ये साधारण १५ राऊंड बसतात. गावठी पिस्टलमध्ये साधारण १० ते १२ राऊंड बसतील अशा पद्धतीने रचना असते. सर्वसाधारणपणे अशा गावठी पिस्टलमध्ये १० राऊंड बसविण्याची रचना असते. परंतु, त्यातील स्प्रिंगचे टेन्शन चांगले रहावे, यासाठी त्यात शेवटचे दोन गाळे गुन्हेगार रिकामे ठेवतात.त्यामुळे तयारीनिशी आलेल्या दोन गुन्हेगारांकडील पिस्टलमध्ये प्रत्येकी ८ राऊंड असू शकतात. दोघांनी मिळून १२ राऊंड फायर केलेले असू शकते.






















