पैशामुळे लग्नात बदनामी होईल म्हणून जिवलग मित्राचा काढला काटा

पैशामुळे लग्नात बदनामी होईल म्हणून जिवलग मित्राचा काढला काटा

स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – उसने दिलेले पैसे मागत असल्याचा राग आल्याने मित्राच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अतिक तांबोळीला मध्यरात्री बीड शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय ३० वर्षे ) यांच्या निघृण खून करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला २४ तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपी हा चांदचा जिवलग मित्र अतिक तांबोळी असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीला बेदम मारहाण करून केला खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदने आरोपी अतिककडे दीड लाख रुपये दिले होते. हे पैसे परत मिळावेत यासाठी चांद सतत तगादा लावत होता. आरोपी अतिकचे सोमवारीच लग्न होणार होते. पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन, असा इशारा चांदने दिल्याने अतिक प्रचंड चिडला होता. लग्नाच्या दिवशी बदनामी होईल, नातेवाईकांसमोर अपमान होईल या भीतीने अतिकने टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री अतिकने चांदला डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा पैशावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. अतिकने जवळच असलेल्या दगडाने चांदच्या डोक्यावर मारहाण केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकऱ्यांना शिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता मृतदेहाची ओळख चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी अशी पटली आहे .

शेवटचा फोन ठरला अखेरचा संवाद

चांद रविवारी बीडला आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने आपल्या पुतण्याला फोन करून, गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल, असे सांगितले होते. दुर्दैवाने, हीच त्याची शेवटची विचारपूस ठरली. दरम्यान, ज्या मित्राच्या लग्नासाठी चांद उत्साहाने तयारी करत होता, त्याच मित्राने दीड लाख रुपयांच्या वादातून त्याचा काटा काढल्याची बाब समोर आल्याने रायमोह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पैसे आणि प्रतिष्ठेच्या भीतीपोटी माणुसकी हरवली, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयाची सुई मृताच्या मित्र अतिक तांबोळीवर स्थिरावताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मध्यरात्री बीड शहरातून आरोपीला अटक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×