दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भिकू विष्णू शिंदे (वय ५०, रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत शिंदे यांची पत्नी सारिका (वय ४८) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार श्रीकांत अनंता कानगुडे (वय २७, रा. दुर्गा सोसायटी, साईनगर, हिंगणे खुर्द ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवाजा जवळील बुटात फ्लॅटची चावी ठेवणे पडले महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका शिंदे यांचे पती भिकू हे माळीकाम करतात. मंगळवारी (६ ऑक्टोबर) ते सकाळी आठच्या सुमारास कामावरुन घरी निघाले होते. हिंगणे खुर्द भागातील महादेवनगर येथे रस्ता ओलांडणाऱ्या भिकू यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार गंभिरे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी ज्येष्ठाकडील २ लाखांची सोनसाखळी लंपास
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील २ लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्याने लांबविल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील उबाळेनगर भागात राहायला आहेत. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ते विमाननगर ते वाघोली या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होते. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ लाख रुपयांची सोनसाखळी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत.
























