दहशतीच्या बळावर आंदेकर टोळीने कमाविली १८ कोटी रुपयांची मालमत्ता

३७ बँक खात्यातील १ कोटी ४७ लाखांची रक्कम गोठविली

marathinews24.com

पुणे – टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध कडक कारवाईची पावले उचलली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांची १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता तपासात निष्पन्न झाली आहे. आंदेकर कुटुंबीय, तसेच टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड – सविस्तर बातमी

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. वनराजच्या खून प्रकरणात बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर, मुलगी संजीवनी, तिचा दीर जयंत, तसेच सोमनाथ गायकवाडसह साथीदारांना अटक करण्यात आली होती. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५ सप्टेंबर २०२५ रोजी नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात गणेश कोमकर याचा वीस वर्षीय मुलगा आयुष याच्यावर बेछूट गोळीबार करुन खून करण्यात आला होता. आंदेकर टोळीतील अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पोलीस तपासात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू याने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वत:चा नातू आयुष याचा खून घडवून आणला होता. या प्रकरणात आंदेकर याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली.

वनराजची पत्नी सोनाली, आंदेकरची विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर, तिची मुले, पुतणे शिवम,अभिषेक, शिवराज, त्यांची आई माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना अटक करण्यात आली. तपासात दोन पिस्तूल, चार मोटारी, चार दुचाकी, २८ मोबाइल , आंदेकरच्या घरातून सोन्याचे दागिने असा ९५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आंदेकर कुटुंबीय, तसेच त्याच्या टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

आयुष कोमकर खून प्रकरणात ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर कुटुंबीयांची मालमत्ता निष्पन्न करण्यात आली आहे. बंडू आंदेकरची फुरसुंगी येथे २४.५ गुंठे जागा, कोथरूडमध्ये दोन सदनिका, दोन दुकाने, तीन मजली घर, नाना पेठेत सदनिका, लोहियानगर भागात दोन खोल्या, हडपसरमधील साईनाथ वसाहतीत एक खोली अशी मालमत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर हिच्या नावावर तीन मजली घर, एक टपरी, साईनाथ वसाहतीत एक खोली, शिवम आंदेकरच्या नावावर मुळशीतील आगळांबे गावात २२ गुंठे जागा, कोथरूड, नाना पेठेत दोन सदनिका, दुकान, शिवराज आंदेकरच्या नावावर नाना पेठेत एक सदनिका, सोनाली आंदेकरच्या नावावर नाना पेठेत दोन दुकाने आहेत. १६ करारनामे, त्याच्याशी संबंधित मालमत्तांबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

बंडू आंदेकर, त्याची मुलगी वृंदावनी वाडेकर यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण नष्ट केल्या प्रकरणी आंदेकरचा विश्वासू साथीदार मोहन चंद्रकांत गाडेकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालायाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×