अपर्णा केळकर यांच्या सादरीकरणाराला रसिकांची दाद; आषाढी वारीनिमित्त रंगला ‘तुका म्हणे’ सांगीतिक कार्यक्रम
marathinews24.com
पुणे – ‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा – संत तुकाराम महाराज यांचा सामान्य व्यक्ती ते संतत्वार्पंतचा प्रवास, त्या काळात त्यांच्या आयुष्यात आणि मनात चाललेला बाह्य आणि आंतरिक झगडा, त्यांना विठ्ठलाच्या रूपाचा-कृपेचा लागलेला ध्यास, संतपदाला पोहोचल्यानंतर त्यांच्यातून प्रकट झालेला अनुभवसंपन्न वाग्वविलास, पांडुरंग भेटीची उत्कटता-निकटता या सर्वांचे अनोखे संगीतमय दर्शन रसिकांना घडले. निमित्त होते आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘तुका म्हणे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा: भत्त्यांमध्ये मोठी वाढ – सविस्तर बातमी
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा केळकर यांनी रसाळ, मधुर वाणीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज रचित अभंगांचे सादरीकरण करत रसिकांना भक्तीरसाचा अनुभव दिला.
टिळक रस्त्यावरील हिराबाग येथील श्रीराम लागू रंगावकाश येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ हा गजर केल्यानंतर आत्मशक्तीचा परमविलास दर्शविणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’ या अभंगाच्या सादरीकरणातून संत तुकाराम महाराज यांना पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली आस रसिकांना भावपूर्णतेचा आनंद देऊन गेली. नाम संकीर्तनाची महती दर्शविणाऱ्या ‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’ या अभंगाला रसिकांनीही गायन साथ देत नामाची महती अनुभवली.
विठ्ठलाला माऊलीच्या स्वरूपात पाहताना संत तुकाराम महाराज यांनी रचलेला ‘विठ्ठल माझी माय, आम्हा सुख उणे काय’ या अभंगाच्या सादरीकरणानंतर अपर्णा केळकर यांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा अभंग भक्तीरसपूर्णतेने सादर केला. ‘पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे’ या अभंगातून ‘मी’पणाचा विलय दर्शविणारा भाव उत्पन्न झाला. ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. तर कार्यक्रमाची सांगता पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने केली.
अपर्णा केळकर यांना प्रसाद जोशी (पखवाज), कौशिक केळकर (तबला), लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), मंगेश जोशी (तालवाद्य), क्षितिज भट (कीबोर्ड), धवल जोशी (बासरी) यांनी सुमधुर साथसंगत केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निरूपण डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. स्वरसाथ रुचीर इंगळे, गार्गी काळे, शर्विन पिंगे, श्रुती डोरले यांनी केली.