वाहनावर सोसायटीच्या पार्किंगचे स्टिकर नसल्याने कुटुंबाला सुरक्षा रक्षकांनी केली मारहाण – नांदेड सिटी टाऊनशिप मधील घटना
Marathinews24.com
पुणे – वाहनावर सोसायटीच्या पार्किंगचे स्टिकर नसल्याने सुरक्षा रक्षकांनी रहिवाशाला थांबवून ठेवले. त्यांची पत्नी रहिवासी कार्ड घेऊन येईपर्यंत ८ ते १० जणांनी संबंधित रहिवाशाला बेदम मारहाण केली. त्यांची पत्नी
व मुलगा आल्यावर त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही घटना नांदेड सिटी टाऊनशिपच्या मधुवंती सोसायटीच्या मेनगेटवर मंगळवारी (दि. ८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे (४२, रा. मधुवंती सोसायटी, नांदेड सिटी टाऊनशिप, नांदेड गाव) यांनी नांदेड सिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिक्युरिटी नेवरकर व आश्विनी दंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनकवडे हे गेल्या १० वर्षांपासून तेथे राहण्यास असून त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मंगळवारी (दि. ८) नांदेड सिटीच्या सिक्युरिटी गार्डनी वाहनांवर सोसायटीचे स्टिकर नसलेल्या गाड्या थांबवून ठेवल्या होत्या. त्यानुसार प्रफुल्ल सोनकवडे यांनी पत्नीला फोन करुन सांगितले की, गेटवरून सिक्युरिटी गार्ड कोणालाच स्टिकर असल्याशिवाय आत सोडत नाही. त्यामुळे सोसायटीत राहणारे लोकांशी खूप वाद चालू आहेत, असे सांगून त्यांनी सोसायटीचे रेसिडेन्सी कार्ड घेऊन येण्यास सांगितले. प्रेरणा मुलगा ओमकार (२२) याला घेऊन गेटवर आल्या. तेथे नेवरकर व आश्विनी दंडाळे हे वाद घालून अरेरावीची भाषा करुन अंगावर धावून जात होते. तेव्हा प्रेरणा व त्यांचा मुलगा त्याचे वाद सोडवण्यासाठी गेले असता आरोपी नेवरकरने त्यांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली. तेव्हा त्यांचा मुलगा वाचवण्यासाठी गेला असता तेथे असलेल्या ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी प्रेरणा व ओमकार यांना
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पतीस नेवरकर व दंडाळे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. मारामारीत त्यांचा मुलगा ओमकार याच्या डोक्याला, तोंडाला व इतर ठिकाणी मार लागला. ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सिक्युरिटी आश्विनी दंडाळे (२८) यांनी देखील प्रफुल्ल सोनकवडे, ओमकार सोनकवडे आणि शुभांगी सोनावले यांच्या
विरोधात नांदेड सिटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
सुरक्षा रक्षकांना बजावली नोटीस
नांदेड सिटी प्रशासन प्रमुख मनोज शर्मा यांनी माध्यमांना माहिती देताना, मधुवंती इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी प्रवेशासाठी आवश्यक स्टिकर, कागदपत्रे दाखवण्याची विनंती केल्यानंतर किरकोळ शाब्दिक चकमकीमधून सुरू झालेला हा प्रकार आहे. याशिवाय कोणतेही कारण नाही. सुरूवातीला संबंधित रहिवाशाने सुरक्षा रक्षक, सुपरवायझर व रक्षकांना मारहाण केली. त्यानंतर आपल्या बचावासाठी सुरक्षा रक्षकाने त्या नागरिकाना मारहाण केल्यातून हा प्रकार घडला. दरम्यान आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून संबंधित सुरक्षा रक्षकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे सांगितले.