स्वारगेट एसटी स्थानकात कारवाई
marathinews24.com
पुणे – गांजा तस्करीच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या पथकाला यश आले आहे. टोळीकडून सव्वा लाख रूपये किमतीचा गांजा, अलिशान मोटार असा १६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित तस्कराला पकडण्यासाठी पथकाने स्वारगेट एसटी स्थानकात कसरत केली. नितीन नरसिंह पाल (वय २३ रा. ग्रीन सिटीच्या पाठीमागे वेळापुर, सोलापुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे इतर दोन साथीदार अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८ ) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१ रा. वेळापुर ता. माळशिरस जि.सोलापुर) यांना अटक केली आहे.
लोहगावमध्ये गांजा विक्री करणार्या मजूराला अटक – सविस्तर बातमी
स्वारगेट एसटी स्थानकातून वेळापूरच्या दिशेने जाणार्या एकाकडे गांजा असल्याची माहिती १९ जूनला पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत यांना मिळाली होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पथकाने त्याचा शोध घेत विचारणा केली असता, आरोपी बॅग सोडून पळून जात होता. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल होळकर, नवनाथ शिंदे व विक्रम सावंत यांनी पाठलाग करुन आरोपी नितीन पाल याला शिताफीने पकडले त्याच्या बॅगमध्ये गांजा मिळून आला. चौकशीत त्याचे साथीदार अल्ताफ आणि विठ्ठल ऊर्फ दादा यांच्यावतीने गांजा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
उर्वरित गांजा गाडी नंबर (एम. एच. ४५ए. डी. ३३३३) यामध्ये साठा करुन ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी एक विशेष पथक तयार केले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, फिरोज शेख, सुजय पवार यांना वेळापुर, पंढरपुर या भागात रवाना करुन संशयीत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेउन पकडले. ही कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुजय पवार, नवनाथ शिंदे, प्रिती मोरे, सुजाता दांगट, राजेश गोसावी, विजय लोयरे यांनी केली.