पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून तिचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती प्रणिल निकुडे (वय ३२), सासरे उदय (वय ६०), सासू वैशाली (वय ५५), दीर प्रतीक (वय ३०, सर्व रा. वडगाव शेरी), चुलत दीर प्रमोद, चुलत सासरे माणिक (रा. कल्याणीनगर) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
सोसायटी स्थापनेसाठी ३ हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय तरुणीचा आरोपी प्रणिल निकुडे याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्यात काही वस्तू दिल्या नाही. आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे पती प्रणिलने तिला सांगितले. त्यानंतर पती प्रणिल, सासरे, उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक, प्रमोद, चुलत सासरे माणिक यांनी तिला टोमणे मारुन शारिरिक आणि मानसिक छळ सुरू केला.त्यानंतर २५ जून रोजी तरुणीला पती प्रणिलने मारहाण केली.
त्याने तिचा गळा दाबला, तसेच तिचा मोबाइल फोडला. तरुणीला फरफटत सदनिकेच्या गॅलरीत नेले. तिला तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी सासरे उदय यांनी दिली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करत आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर शहर परिसरात विवाहितांचा छळ केल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात पतीच्या छळामुळे महिलेने सहा वर्षांच्या मुलासह पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना नुकतीच घडली होती.
लाच घेणारे न्यायालयातील लिपिक अटकेत
न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुच्या ताब्यातून सदनिकेचा ताबा मिळवून दिल्यानंतर सदनिका मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या न्यायालयातील लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात अलाा आहे. याप्रकरणी न्यायालयातील लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवार आणि भुसारी हे भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात नियुक्तीस आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदारांची सिंहगड रस्ता भागातील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत सदनिका आहे. त्यांनी भाडेतत्त्वावर सदनिका दिली होती. भाडेकरु सदनिकाचा ताबा सोडत नसल्याने तक्रारदाराने याबाबत भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदााच्या बाजून निकाल देऊन भाडेकरुला त्वरीत ताबा सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी न्यायालयातील लिपिक रवींद्र पवार, अमित भुसारी यांना नेमण्यात आले होते.
न्यायालयीन आदेशाची पूर्तता करुन तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यासाठी दोघांनी तक्रारदारांकडे ४० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने २१ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांनी तडजोडीत ३५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी (२७ जून) लिपक पवार आणि भुसारी यांनी न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता केली. तक्रारदाराच्या ताब्यात सदनिका दिली.
ही कारवाई पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराला सिंहगड रस्त्यावरील एका उपाहारगृहात पवार आणि भुसारी यांनी बोलाविले. उपहारागृहाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या पवार आणि भुसारी यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.