पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

डाळिंब पिकासाठी १४ जुलै तर सिताफळ पिकासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत 

marathinews24.com

पुणे – पुनर्रचित हवामान आधरित फळपीक विमा योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत असून डाळिंब पिकासाठी १४ जुलै तर सिताफळ पिकासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

वाघोलीतील मतदारांचे मताधिकार हिरावले जात आहेत – सविस्तर बातमी 

योजनेत सहभागासाठी प्रती शेतकरी कमीत कमी उत्पादनक्षम २० गुंठे क्षेत्राची (०.२०.हे.) मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हेक्टर अशी आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नमूद आणि पात्र क्षेत्र मर्यादेपेक्षा कमी फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

पुनर्रचित हवामान आधरित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभागी होण्यासाठी घोषणापत्र अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे.योजनेत सहभाग घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, शेतकरी ओळखपत्र क्रमांक, आधार कार्ड, बँक खाते, जमीन धारणा उतारा, फळबागेचे छायाचित्र, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top