मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासह महिलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर तब्बल २८०० सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ लवकरच केला जाणार आहे. अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून, नव्याने नियंत्रण कक्ष (कंट्रोल कमांड सेंटर) देखील सुरू केले जाणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
पुण्यातही रूटमार्च अन मॉकड्रील – सविस्तर बातमी
मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधित टेकड्यांवर सायरन देखील बसवले जाणार आहेत. तरुणीवर बलात्काराच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या, लूट थांबवण्यासाठी टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्यासह १ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. जेथे वीजपुरवठा नाही, अशा टेकडीवर पोलिस मदत केंद्र उभारले जाणार आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विवेक पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
तब्बल २८०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसणार
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या योजनेला सुरूवात होणार आहे. मुख्य २ फेजचे उद्घाटन यावेळी केले जाणार आहे. याशिवाय मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल, पीए सिस्टिमचे देखील उद्घाटन केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३६०० कोटींच्या ड्रगची होणार होळी
गुन्हे शाखेने मेफेड्रोन तस्करीचा पर्दापाश करीत तब्बल ३६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. संबंधित रॅकेट पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उकलकीस आणले होते. त्यानंतर पथकाने विश्रांतवाडी कुरकुंभमधून तब्बल १८०० किलोवर मेफेड्रोन जप्त केले होते. जप्त केलेले मेफेड्रोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नष्ट केले जाणार आहे. यासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी आणि पुणे पोलिसांची नुकतीच बैठक पार पडली असून, पुणे पोलिसांनी अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी पोलीस दल सदैव कार्यमग्न आहे. त्यासोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षिततेत अतिरिक्त भर पडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ३६०० कोटींच्या ड्रग्जचीही होळी केली जाणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर




















