तळजाई माता मंदीर परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – मॉर्निंग वॉक करणार्या जेष्ठाच्या गळ्यातील ४ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना ४ नोव्हेंबरला सकाळी सव्वा पाचच्या सुमारास तळजाई माता मंदीर, पद्मावती परिसरात घडली आहे. याप्रकरणी गुलटेकडीतील सॅलेसबरी पार्कात राहणार्या ७३ वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टास्कच्या आमिषाने तरूणाला गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक असून, गुलटेकडी परिसरातील सॅलेसबरी पार्कात राहायला आहेत. ४ नोव्हेंबला सकाळी पाचच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी तळजाई माता मंदीर परिसरात जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी जेष्ठाला अडवून त्यांच्या गळ्यातील ४ लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली. जेष्ठाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर तपास करीत आहेत.
पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी
हिवाळ्यामुळे शहरातील विविध भागात आता व्यायाम करण्यासाठी जेष्ठ नागरिकांसह तरूणांची संख्या वाढत आहे. विशेषतः मध्यवर्ती टेकड्यांसह रस्त्यालगत नागरिक व्यायाम करीत असतात. नेमकी संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी आता जेष्ठांना लक्ष्य केले आहे. त्याद्वारे पहाटेच्या सुमारास निमर्नुष्य ठिकाणांवर अडवून त्यांच्याकडील ऐवजाची लुट केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पहाटेच्या सुमासरास व्यायाम करणार्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस पेट्रोलिंग वाढण्याची मागणी केली जात आहे.





















