अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ- प्रा. मिलिंद जोशी

अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ- प्रा. मिलिंद जोशी

आडकर फौंडेशनतर्फे रवी वाघ यांचा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने गौरव

marathinews24.com

पुणे -धडधाकट व्यक्ती दु:खे सजवतात म्हणून ती दु:खे मोठी होतात. आशा-निराशेच्या खेळात निराशा वरचढ ठरते; पण प्रतिकुलतेतून अनुकुलता, अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. सामान्य माणसांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते दिव्यांगांना अंतःचक्षूमुळे आणि जीवनदृष्टीमुळे दिसते. केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

फेरीवाल्यांचे दैनंदिन शुल्क कमी करण्याची मागणी – सविस्तर बातमी 

आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ दृष्टीहीन, मूकबधिर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांचा आज (दि. 27) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. रवी वाघ यांच्या दिव्यांग पत्नी प्राचार्य संजीवनी वाघ यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

नैराश्यवादाने ग्रासलेल्या काळात सकारात्मक आशावादाची पेरणी झाली पाहिजे असे सांगून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वाघ यांच्यासारख्या व्यक्तींची चरित्रे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असावीत. यातून आत्मिक बळ वाढून नैराश्यावर मात करण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत होईल. तत्काळ पराभव स्वीकारून जिंकलेल्याचे अभिनंदन करणे ही खिलाडू वृत्ती मैदानी खेळ खेळताना निर्माण होत असल्याने वाघ यांच्यात सकारात्मकता आली आहे, असे जाणवते.

गुणवत्तेचे उद्यान असलेल्या समाजातील हिऱ्यांची ओळख उमदेपणाने समाजाला करून देण्याचे कार्य ॲड. प्रमोद आडकर सातत्याने करत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे प्रा. जोशी म्हणाले.

जीवनात खचू नका; हार मानू नका : रवी वाघ

सत्काराला उत्तर देताना रवी वाघ म्हणाले, या पुरस्काराने मला प्रेरणा दिली असून पृथ्वीतलावर असे पर्यंत कार्यरत राहण्याची ताकदही दिली आहे. जन्मापासून दृष्टीहिन असलो तरी घरच्यांची साथ, घरातील खेळाचे वातावरण, मित्रमंडळी, भाऊ यांच्या सहकार्याने मी सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आलो. यातूनच क्रिकेट या खेळाविषयी ओढ निर्माण झाली आणि ब्लाईंड स्कूलतर्फे क्रिकेट खेळताखेळता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळण्याची संधी मिळाली. जीवनात कधीही खचून जाऊ नका, हार मानू नका, ज्याने आपल्याला पृथ्वीवर आणले तोच आपली सोय करतो असा विश्वास ठेवून कार्यरत रहा असा सल्लाही त्यांनी युवा पिढीला दिला.

दिलीप शेलवंते यांनी रवी वाघ आणि ॲड. प्रमोद आडकर यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top