संगणक अभियंत्याची फसवणूक
marathinews24.com
पुणे – Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याची ३ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगणक अभियंत्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कारागृहातून सुटलेल्या गुंडाकडून पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संगणक अभियंता वानवडी भागात राहायला आहेत. तक्रारदार ५३ वर्षीय संगणक अभियंत्याला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश समाजमाध्यमातून पाठविण्यात आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.
त्यानंतर तक्रारदाराचा व्हाट्सअप समुहात समावेश करण्यात आला. मोठ्या किंमतीचे शेअर खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. शेअर खरेदीचे सर्व व्यवहार एका ॲपमध्ये दिसतील, असे त्यांना सांगण्यात आले.
तीन महिन्यात संगणक अभियंत्याने सायबर चोरट्यांनी दिलेल्या १९ बँक खात्यावर वेळोवेळी ३ कोटी ७१ लाख २५ हजार रुपये जमा केले. परताव्यापोटी त्यंना सात हजार रुपये देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यंच्या बतावणीकडे, तसेच त्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे काणाडोळा करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
वानवडीत टोळक्याची कोयते उगारून दहशत
Crime News : वानवडी भागात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते आपटले, तसेच खिडकीची काच फोडली. दहशत माजवून पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे यांना अटक करण्यात आली. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड, मोरे यांचे वानवडी भागातील सिद्धार्थ काकडे याच्याशी वाद झाले होते. राठोड याच्याविरुद्ध यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. मध्यरात्री राठोड आणि मोरे हे काकडे याचे घर शोधत होते. काकडे याचे घर समजून आरोपींनी तुकारम कांबळे (वय ५२) यांच्या घराच्या दरवाज्यावर आरोपींनी कोयते आपटले.
खिडकीच्या काचा फोडून दहशत माजविली. या घटनेनंतर पसार झालेल्या राठोड आणि मोरे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दिली. पाेलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करत आहेत.