मद्यपी पोलीस उपनिरीक्षक निलंबित
marathinews24.com
पुणे – Crime News : मद्यपी वाहन चालकांकडून होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी शहरात मद्यपी वाहनचालकांवरिुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाई सुरू करण्यात आली आहे. लष्कर भागातील पूलगेट परिसरात रात्रपाळीत मद्यप्राशन करुन उपनिरीक्षक मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी मद्यपी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले. संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत.
पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक फरासखाना पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी
माटेकर यांची २९ जून रोजी लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीसमोर नाकाबंदीसाठी नेमणुक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कर्मचारी मद्यपी वाहन चालकांची तपासणी करत होते. तपासणी करताना एका मोटार चालकाशी त्यांचा वाद झाला. मोटाराचालक नवी मुंबईतील होता. ठेकेदार असलेला मोटारचालक आणि मित्र तेथून निघाले होते. त्या वेळी ठेकेदार अरुण सूर्यवंशी आणि मित्रांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. सूर्यवंशी यांच्याकडे रिव्हाॅल्वर सापडले होते. चौकशीत त्यांच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी वादावादी झाल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी उपनिरीक्षक माटेकर हे ओरडत होते. माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय होता. त्यामुळे माटेकर यांच्यासह ठेकेदार सूर्यवंशी यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत सूर्यवंशी, तसेच उपनिरीक्षक माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. उपनिरीक्षक माटेकर यांची चौकशी करण्यात आली. त्यांचे वर्तन अशोभनीय असून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून माटेकर यांना निलंबित करण्याचे आदेश उपायुक्त हिमत जाधव यांनी दिले.
शाळकरी मुलीचा विनयभंग, क्रीडा शिक्षक अटकेत
पुणे – Crime News : शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील क्रीडा शिक्षकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. मंगेश बोराटे (वय ४०, रा. चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोराटे याच्याविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचाारांपासून संरक्षण कायद्यातील कलमांन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी चंदननगर भागातील एका शाळेत आहे. आरोपी बोराटे हा क्रीडा शिक्षक आहे. ‘मुलींनी चांगला व्यायाम केला तर त्यांच्याकडे मुले बघतील. तुला मित्र आहे का?, तसेच मुली हसल्यानंतर मुलांची धडकन वाढते’, असे पीडित मुलीला बोराटे म्हणाला होता. वर्गात असे प्रश्न विचारल्याने मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली, असे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर बोराटे याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
प्रेमसंबंधास नकार दिल्याने मारहाण
Crime News : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला मारहाण करण्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शिवसागर मदन गौड (वय २५, रा. मंगळवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपी गौड आणि तरुणीची ओळख होती. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. गौड याच्या वर्तनामुळे तरुणीने त्याला प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिला. तरुणीने त्याला झिडकारल्यानंतर गौडने तिला मारहाण केली. मोबाइलवर काढलेली छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार बांबळे तपास करत आहेत. हडपसर भागात मुलीने प्रेमसबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला धमकावून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर रमेश शिंदे (वय २०, रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, १६ वर्षीय मुलीने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.