विश्वास पाटील यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी न झाल्यास संघर्ष उभारणार – संभाजी ब्रिगेड
marathinews24.com
पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड जाहीर झाली आहे. साताऱ्यात २०२६ जानेवारी महिन्यात संमेलन होणार आहे. ही निवड छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, शिव-शंभू प्रेमींच्या भावनांशी खेळ करणारी आणि अस्वीकार्य असल्याने संभाजी ब्रिगेड याचा तीव्र निषेध करत आहे.
महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम; ‘खेळ रंगला वारकर्यांचा’ २८ सप्टेंबरला – सविस्तर बातमी
छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. रणशूर, पराक्रमी, दूरदृष्टी असलेले राज्य कारभारी, आणि विद्वत्तेच्या जोरावर शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारे राजे होते. १६ वर्षांच्या शौर्यपूर्ण लढायांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी झोपेचे, सुखसोयींचे व आयुष्याचे बलिदान दिले. १८ वेद, ६ उपनिषदे, अनेक भाषांचे ज्ञान असलेले संभाजी महाराज हे खरे विद्वान व सांस्कृत पंडित होते. बुधभुषण, नखशिखांत, सातशतक व नायीकाभेद हे ग्रंथ त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी लिहीले होते.
पराक्रमी, विद्वान सम्राटाचे चारित्र्यहनन करण्याचा, आणि इतिहास विकृत करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आक्षेपाचे मूळ कारण विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या “संभाजी” या कादंबरीत महाराजां विषयी खरी माहिती न देता खोटेपणा, आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सादर केला आहे. हा मजकूर लाखो शिवप्रेमींच्या भावनांचा अवमान करणारा आहे. हे लेखन म्हणजे संभाजी महाराजांचा सरळसरळ अपमान आणि त्यांच्या बलिदानाला काळीमा फासणारे कृत्य आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने विरोध करून आक्षेप नोंदवला, पण विश्वास पाटील यांनी मजकूर दुरुस्त केला नाही. अशा विकृत लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनविणे म्हणजे संभाजी महाराजांच्या चारित्र्य हननाला शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जाणीवपूर्वक अशा विकृत, वादग्रस्त, भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्याला त्याची लायकी व कुवत नसताना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड करून महाराष्ट्रातील देशातील छत्रपती संभाजीमहाराज प्रेमींना डिवचण्याचं काम केलं आहे.
कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई- संभाजी ब्रिगेडतर्फे विश्वास पाटील व अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे यांना पुणे येथील अॅड. मिलिंद द. पवार यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस आधीच बजावण्यात आली आहे. या नोटिशीतील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही केवळ न्यायालयीन लढाई नव्हे तर रस्त्यावर उभे राहून संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. कादंबरीतील आक्षेपार्ह मजकूर तातडीने मागे घ्या. महाराजांच्या पुतळ्याजवळ नाक घासून सार्वजनिक माफी मागा. अन्यथा संभाजी ब्रिगेड हे संमेलन होऊ देणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याशी आम्ही कायदेशीर, सामाजिक, राजकीय अशा सर्व पातळ्यांवर लढा देऊ. महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत, त्यांच्या वरील खोट्या लिखाणाचा निषेध करणे हीच खरी शिवभक्ती आहे. संभाजी महाराजां विषयी अपमानास्पद मजकूर लिहिणाऱ्या कोणालाही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. हा आक्रोश आता रस्त्यावर उतरेल.
यावेळी पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, अविनाश घोडके, ज्योतिबा नरवडे, सिद्धार्थ कोंढाळकर, संतोष शिंदे प्रिंटर्स, अमित केरकर उपस्थित होते.





















