दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – पुण्याहून पंढरपूरला देवदर्शनासाठी मोटारीतून चाललेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवून दोघा चोरट्यांनी महिलांच्या डोळ्यांत तिखट टाकून लुटमार केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे साडेचारच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ पुणे-सोलापूर महामार्गानजीक घडली आहे.
लुटमारीच्या गोंधळाचा फायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून बाजूला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्याची अब्रु वेशीवर टांगल्याचे दिसून आले आहे. दरम्यान संबंधित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेसह दौंड पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
मद्यपी मोटार चालकाची पोलिसांशी अरेरावी, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ७ जणांचे कुटुंबीय हे पुण्यातून सोमवारी (दि. ३०) पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने मोटारीतून जात होते. सव्वा चारच्या सुमारास ते स्वामी चिंचोली गावाजवळील हॉटेलनजीक चहा पिण्यासह लघुशंका करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाडीचालक लघवीला बाहेर गेला होता. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या कोयताधारी चोरट्यांनी गाडीजवळ येउन, महिलेच्या डोळ्यांत तिखट टाकून दीड लाखाच्या दागिन्यांची लूट केली. त्यानंतर मोटारीत १७ वर्षीय मुलगी बसल्याचे पाहून एका आरोपीने मुलीला कोयत्याचा धाक दाखवून गाडीतून बाहेर काढले.
चहाच्या टपरीमागील नाल्यात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने अल्पवयीनमुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी घाबरलेल्या पीडित कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर उजडल्यानंतर तत्काळ दौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामी चिंचोलीत अवैध धंद्यांना ऊत; दारूविक्री जोमात
स्वामी चिंचोली गावाजवळील पुणे-सोलापूर महामार्गालगत कमी प्रमाणावर लोकवस्ती आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावत असून, वारंवार ट्रक-चालकांसह प्रवाशांची लुटमार केल्याच्या घटना घडत आहेत. प्रत्यक्षात मात्र रावणगाव पोलीस चौकी प्रमुखासह दौंड पोलिसांकडून परिसरात रात्रगस्त न घालणे, पेट्रोलिंगला प्राधान्य न देणे, अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्यामुळेच दारूविक्री वाढीस लागली आहे. विशेषतः बहुतांश हॉटेल, धाब्यावर बिनदिक्कतपणे दारूविक्री केल्याचेही दिसून आले आहे.
त्यामुळे चोरट्यांसह व्यावसायिकांचे फावले असून, दौंड पोलिसांचा हॉटेल व्यावसायिकांवरील आर्थिक वरदहस्त थांबणार की नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. दरम्यान, मुलीवरील अत्याचाराची घटना संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
पुणे जिल्ह्यातील विविध भागात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असून, कोयताधारी टोळक्याकडून लुटमार, मारामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले असून, हद्दीतील शांतता प्रस्थापित करण्यास पोलीस अकार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबतच महिलांसह शालेय विद्यार्थिंनींची सुरक्षा रामभरोसे असल्याची टीका आता केली जात आहे. त्यामुळे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यावसायिकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारे मोटारचालक चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली गावाजवळ थांबले होते. त्यावेळी सोमवारी पहाटेच्या सुमारास कोयताधारी दोघा चोरट्यांनी महिलांना धमकावून त्यांचे दागिने लुटले आहेत. तसेच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आरोपींचा माग काढला जात आहे. – बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड