घायवळ, मारणे, पठाण, आंदेकरला असाही देणार दणका
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कुख्यात टोळ्यांना पुन्हा एकदा रिंगणात घेतले आहे. कुख्यात नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण टोळीला निस्तानाबूद करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांचे आर्थिंक व्यवहार थांबविणे, आतापर्यंत झालेल्या आर्थिंक व्यवहाराची तपासणी करणे, बेनामी संपत्तीची माहिती संबंधित विभागाला देणे, टोळ्यांविरूद्ध प्राप्त तक्रारींनुसार त्वरित कारवाई करणे, सराईतांची दहशत मोडीत काढण्यासाठी कोणताही मुलाहिजा ठेउ नका, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरूवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीत दिले आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
सराईत टोळ्यांतील गुंडाकडून दिवसाढवळ्या गोळीबार, खून, खूनाचा प्रयत्न, दहशतीसह दादागिरी, खंडणी उकळण्याचे सर्रास प्रकार शहरातील कुख्यात घायवळ, मारणे, आंदेकर, पठाण टोळीकडून केले जात होते. त्यापार्श्वभूमीवर संबंधित टोळ्यांना पोलिसांनी वठणीवर आणले आहे. त्यानंतरही त्यांच्या आर्थिंक व्यवहारांचे बारकाईने परिक्षण करावे, मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यवहाराची माहिती आयकर विभागासह संबंधित विभागाकडे पाठवावी. जुन्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करावा. प्राप्त पुराव्यांच्या आधारे छोट्या गुन्हेगारांपासून टोळीप्रमुखापर्यंत आरोपींची कुंडली तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दरम्यान, सराईत टोळ्यांविरूद्ध पोलिसांकडून नव्याने कारवाईचे अस्त्र उगारण्यात आल्यामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर भाईंची हवा काढणार
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी अनेकांकडून अमुक-तमूक भाईची दहशत, आपलीच हवा अशास्वरूपाचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल करीत दबदबा निर्माण केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कुख्यात मारणे, घायवळ, पठाण, आंदेकर टोळीच्या दहशतीचे व्हिडिओ ज्यांनी अपलोड केले आहेत, त्यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यास सुरूवात केली आहे. गुन्हेगारांचा फॅन फॉलोअर, व्हिडिओ व्हायरल करणारे गु्र्रप, अपलोड करणारे हँडलर शोधण्यास पथकाने सुरूवात केली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
घायवळचे पैसे अमोल लाखेने फिरवले, चौकशी होणार
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचे कोट्यावधी रूपये अमोल लाखे याने स्वतःच्या संस्थेच्या नावाने फिरवले आहेत. त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात पवनचक्की बसविण्यासाठी घायवळच्या दबावानेच लाखेच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्याच्या संस्थेच्या बँकखात्यातून कोट्यावधींचे व्यवहार झाले आहेत. याप्रकरणी आता खंडणी विरोधी पथकाकडून अमोल लाखे याच्या बँकखात्याचा तपशील अभ्यासला जात आहे. त्यानुसार आयकर विभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली जाणार आहे.





















