शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने शास्त्रीय कथक नृत्य स्पर्धा 2025चे आयोजन
marathinews24.com
पुणे – शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या सहकार्याने नवोदित कलाकारांसाठी प्रथमच शास्त्रीय कथक नृत्य स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले आहे. दोन फेऱ्यांमध्ये होणारी स्पर्धा 18 ते 30 वयोगटातील नवोदित कलाकारांसाठी आहे. स्पर्धेतील विजेत्या कलाकारास प्रथम क्रमांकास दहा हजार, द्वितीय क्रमांकास आठ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे निमंत्रक डॉ. दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश मूल्य नाही.
डॉ. पूनम शहा यांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन – सविस्तर बातमी
सुप्रसिद्ध नृत्यांगना व कथक गुरू शर्वरी जमेनिस यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात येत आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन आणि अंतिम फेरी ऑफलाईन घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठी कलाकाराने पाच मिनिटांचा नृत्याचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी पुण्यात घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठी पाठविला जाणारा व्हिडिओ संपादित केलेला नसावा. नृत्याचे सादरीकरण साध्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वेशभूषेत असावे. भाव, ताल, लय, मुद्रा, रचनात्मक, पदलालित्य, तंत्र, सौंदर्यदृष्टी हे घटक विचारात घेतले जाणार आहेत. स्पर्धेसाठी वयाचा पुरावा आणि गुरूंचे परवानगीपत्र आवश्यक आहे.
अंतिम फेरीसंदर्भात स्पर्धकांना काही दिवस आधी सूचना दिली जाईल. अंतिम फेरीसाठी स्पर्धकांनी येण्याजाण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. अंतिम फेरीसाठी संगीत ध्वनिमुद्रित किंवा साथीदारांसह चालणार आहे. साथीदारांचा खर्च स्पर्धकाला करावा लागेल. प्राथमिक फेरीसाठी व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 असून स्पर्धकांनी व्हिडिओ https://shorturl.at/LrB07 या गुगल लिंकवर पाठवावा. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी आर्या फणसळकर (मो. 9657367087), वैष्णवी देशपांडे (मो. 7066933241) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















