तीन दिवसीय सहाव्या पुणे पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन – भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेतर्फे रविवारपर्यंत (दि. १८) विनामूल्य खुले
marathinews24.com
पुणे – “समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गनिर्मित अद्भुत ठिकाणी फिरण्याचा अनुभव मनाला सुखदायी असतो. प्रवासातील अनुभव आपल्यातील आत्मविश्वास, सहनशीलतेला चालना देतात. ठरलेली, साचेबद्ध ठिकाणे पाहण्यासोबत ऑफबीट पर्यटनस्थळे, ऐतिहासिक गोष्टी पाहण्याकडे लक्ष द्यायला हवे. आपण जिथे फिरायला जात आहोत, तेथील माहिती, व्यवस्था याचा नीट अभ्यास केला, तर पर्यटन अधिक आनंददायी होते,” असे मत प्रसिद्ध गायिका व सोलो ट्रॅव्हलर डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले. पर्यटनवाढीसाठी अशा स्वरूपाचे महोत्सव उपयोगी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
बीड जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदे भरण्यासाठी मुहूर्त ठरला – सविस्तर बातमी
भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित गेट सेट गो हॉलिडेज व सचिन इंटरनॅशनल प्रस्तुत तीन दिवसीय सहाव्या पुणे पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी गायिका मनीषा निश्चल, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी, चंदन पठारे, अमित कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, हेमंत जानी, सजेश पिल्ले, सतपाल सिंग, सुयोग सकपाळ, शेखर ढमाले, अमोद ब्रह्मे, आशिष हिंगमिरे, संतोष माने, हर्षद खोंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. राधा मंगेशकर म्हणाल्या, “आपल्याला निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. आयुष्यात एकदातरी अशा ठिकाणांना भेटी देऊन अनुभव घेतला पाहिजे. देशांतर्गत, तसेच बाहेरच्या देशांतील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा संच या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. पर्यटन विभागाकडून यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, नाविन्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास व प्रसार केला जात आहे. पर्यटन क्षेत्रातील सर्वच मंडळी पुणेकरांना अनोखी पर्वणी देण्यासाठी मेहनत घेताना पाहून आनंद वाटतो.”
“जेव्हा एकटीने फिरायला सुरवात केली, तेव्हा मला ते आवडू लागले. त्यामुळे माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्यातले भय पूर्णपणे नष्ट झाले, आत्मविश्वास वाढला. जेव्हा तुम्ही एखादे सुंदर ठिकाण, वास्तु किंवा तेथील कलाकृती पाहता तेव्हा तुमचे स्वतःचे खरे विचार तुम्हाला कळतात. त्या भावनांमध्ये कोणाचेही विचार लादलेले नसतात. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतंत्र विचार करु लागता. जिज्ञासूपणे वेगवेगळी ठिकाणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत राहता,” असेही मंगेशकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या व देशाच्या समृद्ध पर्यटन वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्लक्षित ठिकाणांबाबत माहिती दिली जात आहे. देशांतर्गत व विदेशातील पर्यटनाचे अनेक पर्याय असलेल्या जवळपास ७० टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स येथे आहेत. पर्यटनप्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा फेस्टिव्हल पुणेकरांसाठी रविवारपर्यंत (दि. १८) विनामूल्य खुला असणार आहे, असे प्रवीण घोरपडे यांनी सांगितले.
शनिवारी कैलास मानसरोवर यात्रा माहितीसत्र, जंगल पर्यटन मार्गदर्शन सत्र व रविवारी ‘कॉर्पोरेट ट्रॅव्हलचे नवे रूप: २०२६मध्ये पर्सनलायझेशन, टेक्नॉलॉजी आणि कर्मचारी समाधान’ यावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष माने यांनी आभार मानले.





















