समर्थ पोलिसांची कामगिरी, दागिने जप्त
marathinews24.com
पुणे – भरदिवसा घरफोडी करून रोकडसह दागिन्यांची चोरी करणार्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ऐन दिवाळीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तपास पथकाने तातडीने तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठया, असा मुद्देमाल जप्त केला आहे.शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९ रा. सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली – सविस्तर बातमी
दिवाळी सणानिमीत्त तक्रारदार हे पुजा करण्यासाठी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्याने ऐवजाची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराने तातडीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना अज्ञात चोरट्याचा पथकाने मागोवा काढला. त्याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास केला. त्याने शिवाजी खंडागळे असे नाव सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपीविरूद्ध यापुर्वी सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला १९ ऑक्टोबरला अटक करीत त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरीचा ऐवज आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे व भाग्येश यादव यांनी केली.
भरदिवसा घरात शिरून कपाटातील रोकडसह दागिन्यांची चोरी करणार्या आरोपीला समर्थ पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले असून, आणखी तपास करण्यात येत आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे





















