आयुष कोमकर खून प्रकरणात पोलीस कोठडी
marathinews24.com
पुणे – कुख्यात बंडू आंदेकर टोळीने गृह कलहातून महाविद्यालयीन तरुण आयुष कोमकर याचा खून केला होता. या प्रकरणात प्रकरणात पसार झालेला आराेपी कृष्णा आंदेकर मंगळवारी ( दि. १६ ) पोलिसांसमोर हजर झाला. मात्र, त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडला आहे. त्यानेच हल्लेखोरांना पिस्तूल दिली होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. त्यामुळे आरोपी कृष्णाला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीचे ठेवण्याचे आदेश दिले. कोमकर खून प्रकरणातील आरोपींना कृष्णाने पिस्तूल दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू्अण्णा आंदेकर याच्यासह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयुषची आई कल्याणी कोमकर ही बंडू आंदेकरची मुलगी आहे. तिने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पसार झालेले आंदेकर कुटुंबीय आणि साथीदारांना पोलिसांना पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज (वय ४०) हा पसार झाला होता. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. मंगळवारी सकाळी कृष्णा समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याला पोलिासांनी शिवाजीनगर न्यायालायत हजर केले.
कोमकरचा खून करण्यासाठी कृष्णा आंदेकरने पिस्तूल दिले होते, अशी कबुली गोळीबार करणाऱ्या आराेपींनी दिली आहे. आंदेकरला पिस्तूल कोणी दिले तसेच गुन्हा केल्यानंतर तो कोठे गेला, तसेच तो कोणाच्या संपर्कात होता, यादृष्टीने तपास करायचा असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांनी न्यायालयात दिली. या गु्न्ह्याचा सखोल तपास करायचा आहे. आरोपीच्या मालमत्तेची माहिती घ्यायची आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात केली.
आंदेकरच्यावतीने ॲड. मनोज माने, ॲड. मिथून चव्हाण, ॲड. प्रशांत पवार यांनी बाजू मांडली. या प्रकरणातील आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आंदेकर स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे. तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे आंदेकरच्या वकिलांनी सांगितले. दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आंदेकरला गुरुवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पाेलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मोबाइल फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे मोबाइल संच मागितला. तेव्हा त्याने मोबाइल फोडून फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. मकोका कारवाईची नोटीस घेण्यास त्याने नकार दिला. आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहे. आरोपी अमन पठाण याची दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
आंदेकर टाेळीची आर्थिक रसद तोडणार
गणेश पेठेतील नागझरी नाल्याजवळ मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महापालिकेने तीन मजली इमारत बांधली आहे. इमारत बांधल्यानंतर नागझरी नाल्यात बेकायदा मासे विक्री करण्यात येत होती. आंदेकर टोळीकडून मासे विक्रेत्यांकडून दरमहा हप्ता घेण्यात येत होता. मध्यंतरी हप्ता देणयास नकार दिल्या प्रकरणी एका मासे विक्रेत्याला मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी बंडू आंदेकरचा पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. आंदेकर टोळीला मासळी बाजारात हप्तापोटी दरमहा मोठी रक्कम मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मंगळवारी नागझरी नाल्यात मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांना महापालिकेने बांधलेल्या नवीन मासळी बाजारात स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागझरी नाल्याची जागा पाटबंधारे विभागाची आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकर याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ७७ तोळे सेोन्याचे दागिने, मोटार, रोकड, जमीन व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली होती.



















