मध्यवर्ती बुधवार पेठेतील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेतील एका मजुराच्या चेहर्यावर पेपर स्पे मारून त्याच्यावर चाकूने हल्ला करीत लुटल्याची घटना सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. गणेश कांबळे (वय २७ रा. गवळी आळी रविवार पेठ) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी हर्षल खुळे (रा. दत्तवाडी ) याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
मंदीरातील चांदीच्या मुकूटासह पादुकांवर सुरक्षारक्षकाचा डल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गणेश कांबळे मजूर असून रविवार पेठेतील गवळी आळी परिसरात राहायला आहे. १९ मे च्या रात्रीच्या सुमारास तो मित्रासोबत बुधवार पेठेतील म्हसोबा मंदिरासमोरील शांती चौकात उभा होता. त्यावेळी अॅव्हेंजर बाईकवरून आलेल्या तिघांनी गणेशसोबत वाद घातला. हल्लेखारोपैकी हर्षल खुळे याने गणेशला शिवीगाळ केली. त्याच्या शर्टची कॉलर पकडून चेहर्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर धारदार शस्त्र काढून त्याच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान लोक जमू लागले तेव्हा हर्षल दोन साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला.
गंभीर जखमी गणेशला ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्याने रुग्णालयातच फरासखाना पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार दाखल केली. आरोपींनी त्यांना मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. फरासखाना पोलिसांनी आरोपींविरूद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांच्याकडे सोपवला आहे. पोलिसांकडून आरोपी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.